एकीकडे सीएएच्या माध्यमातून इतर शेजारी देशातील नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असताना दुसरीकडे गेल्या ५ वर्षांत तब्बल ६ लाखांहून जास्त भारतीयांनी आपल्या नागरिकात्वाचा त्याग केल्याची माहिती केंद्र सरकारने आज लोकसभेत दिली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान यासंदर्भातली चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी यासंदर्भात लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरामध्ये या आकडेवारीचा समावेश आहे. या भारतीयांनी इतर देशाचं नागरिकत्व स्वीकारण्यासाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केल्याची माहिती देण्यात आली आहे.

परदेशात स्थायिक होण्यासाठी नागरिकत्वाचा त्याग

राय यांनी लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, २०१७मध्ये १ लाख ३३ हजार भारतीयांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केला. २०१८मध्ये हाच आकडा १ लाख ३४ हजार झाला. २०१९मध्ये तो वाढून १ लाख ४४ हजारपर्यंत गेला. २०२०मध्ये करोनाची साथ आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर असणारे निर्बंध, निरनिराळ्या देशांमध्ये लागू असलेले लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर हा आकडा खाली घसरून थेट ८५ हजार २४८ पर्यंत आला. तर २०२१मध्ये निर्बंध हटवण्यात आल्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलेल्या नागरिकांचा आकडा १ लाख ११ हजार इतका झाला आहे.

Latest News on Mamata Banerjee
पश्चिम बंगालमधील शालेय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द; उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का
uddhav thackeray criticized pm narendra modi
“काश्मीर ते मणिपूरपर्यंत खदखद अन् हिंसाचार, तरीही भारतीय नीरोचे…”; ‘त्या’ दाव्यावरून ठाकरे गटाची पंतप्रधान मोदींवर टीका!
Loksatta anvyarth Domestic production expansion to increase exports of electronics from India
अन्वयार्थ: भारतीय जीबी, टीबी चीनच्या स्वाधीन
Parakala Prabhakar criticism of the government development work Pune news
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीचे सरकारवर टीकास्र, म्हणाले, ‘विकास होत असल्याचे दाखवण्याची सरकारला घाई’

आजपर्यंतची आकडेवारी पाहाता एकूण १ कोटी ३३ लाख ८३ हजार ७१८ भारतीय नागरिक विदेशात स्थायिक झाल्याची माहिती राय यांनी या उत्तरात दिली आहे.

भारतीय नागरिकत्वासाठी सर्वाधिक अर्ज पाकिस्तानमधून

एकीकडे नागरिकत्वाचा त्याग केलेल्या भारतीयांची संख्या लाखांमध्ये असली, तरी भारतीयत्वाचा स्वीकार केलेल्या नागरिकांची आकडेवारी देखील राय यांनी दिली. यामध्ये २०१६ ते २०२० या पाच वर्षांमध्ये एकूण ४ हजार १७७ विदेशी व्यक्तींना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहेत. एकूण १० हजार ६४५ व्यक्तींनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज दाखल केले होते. यापैकी सर्वाधिक पाकिस्तान (७७८२), त्याखालोखाल अफगाणिस्तान (७९५), अमेरिका (२२७), श्रीलंका (२०५), बांगलादेश (१८४), नेपाळ (१६७) आणि केनिया (१८५) या देशातून भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज आले होते.

“सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार नियमावली जारी झाल्यानंतर भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येईल”, असं राय यांनी सांगितलं. भारताच्या शेजारी असलेले पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या मुस्लिम बहुसंख्य देशांमधील हिंदु, शिख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन यांना सीएएनुसार भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येणार आहे.