महाराष्ट्रात आघाडीच वरचढ ठरण्याचा दावा

देशात काँग्रेससाठी आशादायी चित्र आहे, भाजपच्या बरोबरीने काँग्रेसला जागा मिळतील, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी शनिवारी मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच आघाडीवर राहील, असे भाकीतही त्यांनी वर्तविले.

महाराष्ट्रासह देशात तीन टप्प्यांत ३०३ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलेले आहे. मी अतिशय प्रोत्साहित झालेलो आहे. म्हणून मी पहिल्या तीन टप्प्यांतील निकालाचे अंदाज वर्तवत आहे. काँग्रेस पक्षाला या लोकसभा निवडणुकीत भाजपएवढे यश मिळेल. याचाच अर्थ काँग्रेसच्या जागा वाढणार आहेत आणि भाजपला मोठा फटका बसणार आहे.

नोटाबंदी व जीएसटीमुळे देशातील जनता त्रासलेली आहे.  मतदारांनी या दोन गोष्टींच्या विरोधात मतदान केल्याचे चिदम्बरम यांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे सरकार आल्यावर आम्ही पुन्हा देशाला प्रगतीकडे नेऊ , शेतकरी कर्जमाफी करू, सुशिक्षित बेरोजगारांना २४ लाख सरकारी नोकऱ्या देऊ, दारिद्रय़ रेषेखालील पाच कोटी कुटुंबांच्या बँक खात्यात वर्षांला ७२ हजार रुपये जमा करून गरिबी नाहीशी करू, इत्यादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांचा त्यांनी पुनरुच्चार केला.

भाजप सरकारने भारताची अर्थव्यवस्था कोलमडून टाकली. बेरोजगारीचा दर ८.४ टक्के एवढा वाढलेला आहे. गेल्या ५० वर्षांतील हा सर्वात जास्त दर आहे. शेतकरीवर्गाची अवस्था वाईट झालेली आहे. सर्व क्षेत्रांतील लोक भाजपवर नाराज आहेत.  लोक आता समजून चुकलेले आहेत की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून धोका आहे. त्यामुळे जनता काँग्रेस व मित्रपक्षांना स्वीकारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘काळया पेटीचे रहस्य काय?’

धुळे येथे सुरेश प्रभू यांच्या खासगी विमानातून एक मोठी काळी पेटी खाली उतरवून त्यांचे सहकारी घेऊन जातानाची चित्रफीत संपूर्ण जगाने पाहिली आहे. त्यावर प्रभू यांनी खुलासा केला की, त्या पेटीत आंबे होते, पण हे साफ खोटे आहे. ती आंब्याची पेटी नव्हती. यासंदर्भात सखोल चौकशी करून योग्य ती कठोर कारवाई करावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली

‘नोटाबंदीत मोठा घोटाळा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला. ते म्हणाले की, २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ना खाऊंगा ना खाने दुंगा, परंतु त्यांचे लोक खायला लागले तेव्हा त्यांनी दुसरीकडे तोंड फिरविले. मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी केली. नोटाबंदी करून रोकडरहित व्यवस्था निर्माण करण्याची घोषणा केली होती. मात्र नोटाबंदीपूर्वी १७.९७ लाख कोटी मूल्याच्या नोटा चलनात होत्या, त्यानंतर एका वर्षांत २०१७ मध्ये २१.४ लाख कोटी मूल्याच्या नोट चलनात आल्या. ३१ डिसेंबर २०१६ नंतर नोटा बदलून घेता येत नव्हत्या. परंतु त्यानंतरही मोठय़ा प्रमाणावर नोट बदल्या गेल्या. नोट बदलण्याची देशभर मोहीम राबविली गेली. केंद्र सरकारमधील एक कर्मचारी त्यात सहभागी होता, त्याचा हवाला देऊन नोटाबंदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला.