नवी दिल्ली : पहलगाम हल्ला आणि त्यानंतर सैन्यदलाने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर लोकसभेमध्ये सोमवारी प्रदीर्घ चर्चा सुरू झाली. चर्चेला सुरुवात करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना लक्ष्य केले. पाकिस्तानने भारताची किती विमाने पाडली, असल्या प्रश्नांतून राष्ट्रहित साधले जात नाही. तर भारताने पाकिस्तानची किती विमाने पाडली, हा प्रश्न विरोधकांनी विचारायला हवा होता, असे ते म्हणाले. विरोधकांकडून पहिले भाषण करताना काँग्रेसचे उप गटनेते गौरव गोगोई यांनी प्रामुख्याने केंद्रीय गृहमंत्र्यांना लक्ष्य केले.
‘ऑपरेशन सिंदूर’बाबत विरोधकांनी एकदाही उचित प्रश्न विचारले नाहीत, असा आक्रमक पवित्रा संरक्षणमंत्र्यांनी घेतला. विरोधकांना प्रश्न विचारायचेच असतील तर त्यांनी आपल्या लष्कराने दहशतावदी अड्डे नष्ट केले की नाही, असे विचारायला हवे होते. त्याचे उत्तर ‘हो’ असेल. कारवाईमध्ये सैन्य हानी झाली का, असे विचारले असते तर त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले असे विचारले असते तर, त्याचे उत्तर ‘हो’ असे असेल. दहशतवाद्यांचे म्होरके ठार झाले असे विरोधकांनी विचारले असते तर त्याचेही उत्तर ‘हो’ असेच असेल, अशा शब्दांत सिंह यांनी विरोधकांना धारेवर धरले.
तर गोगोई यांनी या पहलगाम हल्ला हे केंद्र सरकारचे अपयश असल्याचा प्रहार केला. ‘‘हल्ल्याला १००हून अधिक दिवस झाले तरी केंद्र सरकारला हल्लेखोर दहशतवाद्यांना पकडता आलेले नाही. ते कुठे गायब झाले माहीत नाही. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आहे. त्यांना नायब राज्यपालांच्या आड लपता येणार नाही,’’ अशा शब्दांत गोगोई यांनी तोफ डागली. आज, मंगळवारीदेखील ही चर्चा सुरू राहणार असून सरकारच्या वतीने चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतात का, याची उत्सुकता आहे.
पहलगामचा सूत्रधार चकमकीत ठार
श्रीनगर : लष्कराच्या ‘एलिट पॅरा कमांडों’नी श्रीनगरबाहेर हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन महादेव’ला महत्त्वाचे यश मिळाले असून, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मारला गेल्याचे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. सुलेमान ऊर्फ आसिफ हा २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा संशय असून, सोमवारच्या कारवाईत त्याचे दोन साथीदारही मारले गेले आहेत.
आपण नेहमीच मोठे लक्ष्य साध्य करण्याचा प्रयत्न करायचा असतो. छोट्या छोट्या मुद्द्यांकडे फार लक्ष द्यायचे नसते. नाही तर राष्ट्रीय सुरक्षेवरील लक्ष विचलित होऊ शकते. परीक्षेत विद्यार्थ्याचे लक्ष अधिकाधिक गुण मिळावेत, याकडे असले पाहिजे. त्याने पेन-पेन्सिल तुटण्याची चिंता करायची नसते. – राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा बैसरन पठारावर एकही सुरक्षा जवान नव्हता. गुप्तचर यंत्रणेकडे हल्ल्याची माहिती नव्हती. सुरक्षा यंत्रणांकडून चूक झाल्याची कबुली खुद्द अमित शहांनी दिली होती. आपल्याकडे ड्रोन, पेगॅसस,, निमलष्करी दले आहेत. तरीही पहलगाममध्ये हल्ला कसा होऊ शकतो? – गौरव गोगोई, काँग्रेस</strong>