Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली. या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक पावलं उचलत २३ एप्रिल रोजी काही महत्वाचे निर्णय घेतले. यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या आदेशासह सिंधू पाणी करारही स्थगित केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केला जात असून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्याची मागणी देशभरातून जोर धरत आहे. अशातच आता गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ‘पाकिस्तानात घुसून अशा एका व्यक्तीला मारू, जो एक लाखाच्या बरोबरीचा असेल’, अशी धमकी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून देण्यात आली आहे.
व्हायरल पोस्टमध्ये काय म्हटलं?
गस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “सर्व बांधवांना जय श्री राम, काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप लोकांचा कोणताही दोष नसताना त्यांची हत्या झाली. आम्ही लवकरच त्याचा बदला घेऊ. पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांच्या हत्येचा बदला म्हणून पाकिस्तानात घुसून फक्त एका व्यक्तीला मारू जो एक लाखाच्या बरोबरीचा असेल”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, बिश्नोई गँगचं जी पोस्ट व्हायरल झाली आहे, त्या पोस्टमध्ये लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा फोटोही आहे. तसेच हाफिज सईदच्या फोटोवर फुली (क्रॉस) मारण्यात आलेली आहे.
पहलगाम हल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भारताने २३ एप्रिल रोजी काही महत्वाचे निर्णय घेत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले. तसेच सिंधू पाणी करारही स्थगित केला आहे. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे.