Operation Sindoor News: पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष झाला होता. भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तान व पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील हवाई तळे आणि रडार स्थळांवर ५० पेक्षा कमी हवाई क्षेपणास्त्रे डागली होती. केवळ एवढ्याच हवाई शस्त्रांच्या माऱ्याने पाकिस्तानला “वाटाघाटीच्या टेबलावर यायला भाग पाडले”, असे वायुसेनेचे उपप्रमुख एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांनी सांगितले. भारतीय लष्कराची ही कारवाई अभ्यासकांनी अभ्यासावी अशी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
भारताने ७ मे रोजी सकाळी ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तान व पीओकेमधील अनेक दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराकडून ही कारवाई करण्यात आली होती.
“आपण हवाई शक्तीवर होणारा खर्च आणि त्याच्या फायद्याबाबत पुष्कळ चर्चा केली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही जे केलं त्यापेक्षा दुसरं कुठलं मोठं उदाहरण असू शकत नाही, असं मला वाटतं. ५० पेक्षा कमी हवाई शस्त्रास्त्रांनी प्रतिस्पर्ध्याला चर्चा करण्यासाठी टेबलावर आणता आलं. हे एक असं उदाहरण आहे, जे अभ्यासकांद्वारे अभ्यासलं पाहिजे आणि नक्कीच अभ्यासलं जाईल”, असं एअर मार्शल तिवारी यांनी एरोस्पेस पॉवर सेमिनारमधील एका संवाद सत्रात बोलताना सांगितलं.
दुसरीकडे, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे, असे स्पष्ट करताना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी सांगितलं की, देशाची लष्करी तयारी ही खूप उच्च पातळीवर, दिवस-रात्र आणि वर्षभर सातत्यानं असायला हवी.
जनरल अनिल चौहान यांनी सांगितलं की, भविष्यातील युद्धांसाठी केवळ पारंपरिक सैनिक नव्हे, तर “माहिती योद्धे, तंत्रज्ञान योद्धे आणि विद्वान योद्धे” यांचीही आवश्यकता भासणार आहे. नव्या युद्धपरिस्थितींमध्ये भविष्यातील सैनिकांकडे माहितीचा वापर करणारा, तांत्रिकदृष्ट्या कुशल आणि विचारवंत या तिन्ही गुणांची आवश्यकता भासणार आहे.
सीडीएस यांनी यावेळी असेही नमूद केले की, युद्धात फक्त विजेता असतो, उपविजेता म्हणून कोणालाही ओळखले जात नाही. त्यामुळे लष्कराने नेहमी जागरूक राहून उच्च दर्जाची तयारी ठेवणे अत्यावश्यक आहे.