Indian Website Hack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक मोठे निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवरही भारताने बंदी घातली आहे.

सध्या दोन्ही देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानची चलबिचल झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच भारत कधीही लष्करी कारवाई करू शकतो अशा धास्तीने नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून कुरापती सुरू असल्याचंही समोर येत आहे. दरम्यान, असं असतानाच पाकिस्तानी हॅकर्सनी अनेक भारतीय वेबसाइट्सला लक्ष्य करत असल्याची माहिती समोर येत आहे.

पाकिस्तानी हॅकर्सनी अनेक भारतीय वेबसाइट्स हॅक केल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची आता चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी हॅकर्सनी भारतीय वेबसाईट्सला लक्ष्य करत असल्याचं दिसून येत आहे. तसेच भारत देखील अशा प्रकारचे सायबर हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे.

दरम्यान, पाकिस्तानी हॅकर्स भारताच्या संरक्षण विभागाच्या संदर्भातील काही वेबसाइट्सना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, यामध्ये काही गोपनीय माहिती लीक झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भारत देखील अशा प्रकारचे सायबर हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे.