Pakistani Spies Arrested : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक मोठे निर्णय घेत पाकिस्तानची चहुबाजूने कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवरही भारताने बंदी घातली आहे. दरम्यान, सध्या दोन्ही देशामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

असं असतानाच पाकिस्तानी गुप्तहेर नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आला असून दोन जणांना पंजाब पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. अमृतसर ग्रामीण पोलिसांनी शनिवारी अमृतसरमधील लष्करी छावणी क्षेत्र आणि हवाई तळांची संवेदनशील माहिती आणि छायाचित्रे लीक करण्याच्या आरोपाखाली दोन जणांना अटक केली आहे.

या आरोपींची ओळख पटली असून शेर मसीह आणि सूरज मसीह अशी त्यांचे नावे असल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. ही माहिती देताना पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितलं की, “प्राथमिक तपासात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी या दोन आरोपींचे संबंध असल्याचं उघड झालं आहे. हे संबंध अमृतसर मध्यवर्ती कारागृहात असलेल्या हरप्रीत सिंग उर्फ ​​पिट्टू यांच्या माध्यमातून स्थापित झाले आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.”

तसेच या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जाईल तसे आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता असल्याचंही पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी स्पष्ट केलं. तसेच ते पुढे असंही म्हणाले की, “पंजाब पोलीस भारतीय सैन्याबरोबर खंबीरपणे उभे आहेत आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी सक्षण आहेत. आपल्या सशस्त्र दलांच्या सुरक्षेला हानी पोहोचवण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास कडक आणि तात्काळ कारवाई केली जाईल”, असंही त्यांनी म्हटलं.