Pahalgam Terror Attack Investigation Updates by NIA : काश्मीरमधील बैसरन येथील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास हळूहळू पुढे सरकत आहे. जम्मू-काश्मीर पोलीस, गुप्तचर व तपास यंत्रणा अद्याप हल्लेखोरांना पकडू शकलेले नाहीत. दरम्यान, काही प्रत्यक्षदर्शीने या हल्ल्याबाबतची तपास यंत्रणेला दिलेली माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी एका मोकळ्या मैदानात चार वेळा हवेत गोळीबार करून जल्लोष केला.
जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या मदतीने राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) काही प्रत्यक्षदर्शींकडे चौकशी केली, जे हल्ल्यानंतर बैसरन परिसरात दहशतवाद्यांपासून लपून बसले होते. त्यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की पर्यटकांना मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून जल्लोष केला. दी इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत
एनआयएने गेल्या महिन्यात परवेझ अहमद जौथर व बशीर अहमद या दोन स्थानिकांना दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यांनी तीन सशस्त्र दहशतवाद्यांची ओळख उघड केली आहे. तसेच ते तिघेही लष्कर-ए-तैय्यबा या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं सांगितलं. एनआयएच्या प्रवक्त्याने याबाबतची माहिती दिली आहे.
प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबिती
तपास अधिकारी प्रत्यक्षदर्शींना शोधत असतानाच त्यांना असा साक्षीदार सापडला ज्याने पहलगाममध्ये जे-जे घडलं ते पाहिलं आहे. त्याने सांगितलं की “पर्यटकांना ठार करून दहशतवाद्यांनी तिथून जाताना मला पाहिलं. त्यांनी मला कलमा पठण करण्यास सांगितलं. त्यावर ते लोक एकमेकांशी स्थानिक भाषेत बोलू लागले. त्यानंतर त्यांनी मला सोडून दिलं आणि जवळच्याच मोकळ्या जागेत हवेत चार राउंड गोळीबार केला.”
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार तपास अधिकारी सदर मैदानात गेले. तिथे त्यांना हवेत गोळीबार केलेली चार काडतुसे सापडली. एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने तपास अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्याने सांगितलं की “टेकडीजवळ पहलगाममधील दोन स्थानिक रहिवासी परवेझ व बशीर यांना पाहिलं होतं. ते दोघे हल्लेखोरांचं साहित्य घेऊन तिथे उभे होते.”