पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांचे स्पष्टीकरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील हवामान परिषद आम्ही अपयशी होऊ देणार नाही असा निर्धार भारताने मंत्रीपातळीवरील चर्चेच्या आधी व्यक्त केला आहे. मागील हवामान परिषदा अपयशी ठरल्या होत्या तसे आता होणार नाही, पण श्रीमंत देशांनी कार्बन उत्सर्जनासाठी केलेली उसनवारी आधी परत करण्याचे काम करावे अशी भूमिका भारताने स्पष्ट केली.
संयुक्त राष्ट्रांच्या १९५ सदस्य देशांची मंत्रीपातळीवर बैठक होत असून त्यात हवामान कराराच्या कच्च्या मसुद्यावर चर्चा होत आहे. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे उच्चस्तरीय बैठकीसाठी येथे आगमन झाले, ते म्हणाले की, नवीन हवामान कराराच्या मध्यापर्यंत सर्व देशांचा प्रवास झाला आहे, प्रथमदर्शनी पाहता आपण बदलाच्या उंबरठय़ावर उभे आहोत तरीही कच्च्या मसुद्यात काही प्रश्न अनुत्तरित आहेत. संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल जाहीरनामा व्यवस्था महत्त्वाची असून त्यात कुणी फेरफार करण्याचा प्रयत्न करू नये, मागील हवामान परिषदांमध्ये सर्वच देशांना खोटा आशावाद बाळगून परत जावे लागले होते. भारताच्या दृष्टिकोनातून १.२७ अब्ज लोकांच्या विकासाच्या आशाआकांक्षा महत्त्वाच्या आहेत. हवामान शिखर बैठकीची उद्दिष्टे पूर्ण करण्यात भारत सहभागी असेल पण यात श्रीमंत देशांनी आधी कार्बन उत्सर्जनातील आधीचे कर्ज म्हणजे उसनवारी चुकती करावी व कार्बन उत्सर्जन कमी करण्यात पुरेसा वाटा उचलावा. कार्बन उत्सर्जन कमी करण्यात वेगवेगळी जबाबदारी (कॉमन बट डिफरशिएटेड रिस्पॉन्सिबिलीटीज- सीबीडीआर) स्वीकारण्याच्या तत्त्वाचा आम्ही पुरस्कार करतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pairs climate meet will success javadekar
First published on: 07-12-2015 at 04:32 IST