पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यास पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यात येईल, या भारताच्या इशाऱ्याला भीक न घालता पाकिस्तानने सीमावर्ती भागातील कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. त्यामुळे सीमेवरील तणावाचे वातावरण कायम आहे. शनिवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक राजौरी आणि पूँछ भागात पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात पाच जण जखमी झाले असून त्यात तीन महिलांचा समावेश आहे. पाकिस्तानने गेल्या सहा दिवसांत चार वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
रशियातील उफा शहरात झालेल्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी उभय देशांतील संवाद वृद्धिंगत करण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. मात्र त्यानंतर लगेचच पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचा सपाटा लावत भारतीय हद्दीत गोळीबार आणि बॉम्बफेक करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १५ दिवसांत पाकिस्तानने ११ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
मिठाईला नकार
दरम्यान, ईदनिमित्त सीमा सुरक्षा दलातर्फे सीमाभागांत वितरित करण्यात आलेली मिठाई स्वीकारण्यास पाकिस्तानी रेंजर्सनी नकार दिला. मात्र मिठाई वाटप वगैरे काही झाले नसल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या दिल्लीतील उच्चाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
श्रीनगरमध्ये पाकचे झेंडे
ईदनिमित्त आयोजित प्रार्थना संपल्यानंतर शनिवारी श्रीनगर आणि अनंतनाग जिल्ह्य़ात युवक आणि सुरक्षारक्षकांमध्ये चकमक झडली. युवकांनी सुरक्षारक्षकांवर दगडफेक करून पाकिस्तान, लष्कर-ए-तोयबा आणि इसिसचे झेंडे फडकाविले