भारतातील दहशतवादी कृत्यांना पाकिस्तानचे पाठबळ असल्याचा आरोप करून दाऊद इब्राहिमला त्यांनी आसरा दिला आहे. दाऊद सध्या पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या सीमेवर राहात आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी येथे केला. पाकिस्तानसमवेत सौहाद्र्राचे संबंध असावेत, असेच भारताला नेहमी वाटत आले आहे. परंतु भारताशी मैत्रीपूर्ण संबंध असावेत असे पाकिस्तानला मात्र वाटत नाही, याकडेही राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधले.
दहशतवाद भारतात फोफावला नाही तर त्याला पाकिस्ताननेच त्याला पूर्ण पाठबळ दिल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला. आयएसआयकडून दहशतवादाला पाठबळ मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांप्रकरणी संबंधित आरोपींना शिक्षा करण्यासाठी पाकिस्तान पुढाकार घेत नाही, असे सांगत न्यायालयीन प्रक्रियेसाठीही पाकिस्तान सहकार्य करीत नसल्याची टीका त्यांनी केली. दाऊद याचे पाकिस्तानातच वास्तव्य असून वारंवार विनंत्या करूनही ते त्याला भारताच्या स्वाधीन करीत नाहीत, याकडेही राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ भारतात आले होते, तेव्हा आमच्या पंतप्रधानांनीही त्यांच्याकडे यासंदर्भात सूचना केली होती. दाऊद हा ‘मोस्ट क्रिमिनल वॉण्टेड’ गुन्हेगार असल्यामुळे आम्ही पाकिस्तानवर राजनैतिक दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहोत, असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. दाऊदला पकडण्यासाठी भारताकडून काही कडक उपाययोजना केल्या जात आहेत काय, या प्रश्नाचे उत्तर देताना, आम्हाला काही अवधी द्या, त्यासाठीची व्यूहरचना उघड करता येत नाही, असे सांगत राजनैतिक दबाव वाढवीत असल्यामुळे पाकिस्तानकडूनच दाऊदला आमच्या हवाली कसे केले जाईल, याचे आम्ही प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2014 रोजी प्रकाशित
दहशतवादाला पाकिस्तानचे पाठबळ
भारतातील दहशतवादी कृत्यांना पाकिस्तानचे पाठबळ असल्याचा आरोप करून दाऊद इब्राहिमला त्यांनी आसरा दिला आहे.
First published on: 23-11-2014 at 01:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak sponsoring terrorism dawood is in afghan border rajnath