इस्लामाबाद : आपले सरकार उलथून पाडण्यासाठी अमेरिकेने कट रचल्याचा माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा आरोप पाकिस्तानी लष्कराने खोडून काढला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या (एनएससी) बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनात ‘कट’ हा शब्द वापरला गेला नव्हता, असे लष्कराने म्हटले आहे.

 रशियाने युक्रेनवर आक्रमण केले असता इम्रान खान यांनी रशियात जाणे ‘लाजिरवाणे’ होते, असे वर्णन लष्कराची माध्यम शाखा असलेल्या इंटर-सव्‍‌र्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे (आयएसपीआर) महासंचालक मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी केले, मात्र लष्कराला या भेटीची कल्पना होती हे त्यांनी मान्य केले.

 आपल्याला हटवण्यासाठी अमेरिकेने कारस्थान केले या खान यांच्या आरोपाबद्दल विचारले असता इफ्तिखार म्हणाले की, एनएससीच्या बैठकीबाबत लष्कराच्या प्रतिसादाचा विचार करता, तो पूर्णपणे स्पष्ट करण्यात आला होता आणि त्यानंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनात बैठकीचा निष्कर्ष नमूद करण्यात आला आहे. त्यात वापरलेले शब्द स्पष्ट आहेत.