Pakistan-Afghanistan Conflict : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांच्या या सीमा संघर्षांनंतर वाटाघाटी होण्याची शक्यता वाढत असतानाच त्यांच्यातील चर्चा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. तुर्कियेमधील इस्तंबूल येथे शांतता चर्चा सुरू असताना पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्ला तरार यांनी वाटाघाटीमध्ये अडथळा आल्याचे जाहीर केले आहे. मात्र अद्याप अफगाणिस्तानने अजूनपर्यंत याची पुष्टी केलेली नाही.
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी देखील कथितरित्या चर्चा संपली असल्याचे म्हटले आहे, तसेच त्यांनी असा इशारा दिला की सध्याचा युद्धविराम फक्त तोपर्यंत टिकेल, जोपर्यंत अफगाणिस्तानच्या बाजूने कोणतेही उल्लंघन होत नाही.
असीफ यांनी कथितपणे पाकिस्तानमधील टीव्ही चॅनल जिओ न्यूजला सांगितले की, “आत्ता याच क्षणी चर्चा संपली आहे.”
अफगाण अधिकाऱ्यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सैन्यात झालेल्या संघर्षादरम्यान चार अफगाण सामान्य नागरिकांची हत्या झाल्याचा आरोप केला, आणि यानंतर पाकिस्तानेच्या माहिती मंत्र्यांनी चर्चेत अडथळा आल्याचे जाहीर केले.
तुर्कियेने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने युद्धविराम कायम राखण्यास सहमती दर्शवल्याचे सांगितल्याच्या एका आठवड्यातच वाटाघाटींमध्ये हा नवीन अडथळा निर्माण झाला आहे. “सर्व पक्षांनी युद्धविराम सुरू ठेवण्यास सहमती दर्शवली आहे,” असे तुर्कियेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते.
यामध्ये पुढे म्हटले होते की, “सर्व पक्षांनी एक मॉनिटरींग आणि व्हेरिफिकेशन यंत्रणा सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे, ज्याच्या माध्यमातून शांतता राखली जाईल आणि उल्लंघन करणाऱ्या पक्षावर दंड लादला जाईल याची काळजी घेईल.”
करार लागू करण्याबाबत पुढील चर्चा ही ६ नोव्हेंबर रोजी होणार होती, मात्र पाकिस्तानचे म्हणणे आहे की तालिबान हा २०२१ दोहा शांतता करारानुसार आंतरराष्ट्रीय समुदायाला दहशतवादावर निर्बंध घालण्याबाबत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे.
अत्तातुल्ला तरार यांनी नमूद केले की पाकिस्तानसाठी शांतता आणि स्थिरता महत्त्वाची आहे, पण त्यांच्या लोकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ते उपाय करेल. वृत्तसंस्था एपीने दिलेल्या वृत्तानुसार, तरार म्हणाले की, “पाकिस्तान हा अफगाण लोक किंवा शेजारच्या देशांच्या हितात नसलेल्या कोणत्याही तालिबानच्या निर्णयाला समर्थन देणार नाही.”
पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर काय झालं?
दोन्ही देशांच्या सीमेवर ऑक्टोबर महिन्यात संघर्ष सुरू झाला, याच वेळी तालिबानचे मंत्री अमीर मुत्ताकी हे भारत दौऱ्यावर होते. याची सुरूवात ही तालिबानच्या आरोपाने झाली, ज्यामध्ये त्यांनी काबुल येथे झालेल्या स्फोटांसाठी पाकिस्तानला जबाबदार धरले होते.
याला प्रत्तुत्तर म्हणून तालिबानने पाकिस्तानी सैन्य चौक्यांना लक्ष्य केले, आणि दावा केला की त्यांनी ५८ पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आहे. पाकिस्ताननेही २३ जन ठार झाल्याचे मान्य केले.
त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविरामावर एकमत झाले. मात्र हा युद्धविराम खूप कमी काल टिकला कारण अफगाणिस्तानमध्ये पुन्हा हवाई हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये १० लोक ठार झाले.
सर्वात अलीकडील युद्धविरामाचे उल्लंघन गुरुवारी रात्री झाले, जेव्हा पाकिस्तानमधील चमन सीमेवर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सैन्यांमध्ये कथितरित्या काही वेळासाठी गोळीबार झाला.
