Congress On PM Modi : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांचा जगातील अनेक देशांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेक देशांवर टॅरिफ लादलं आहे. भारतावरही २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतर आठवड्याभरातच २५ टक्क्यांची आणखी वाढ केल्यामुळे भारतावरील एकूण आयातशुल्क ५० टक्क्यांवर पोहोचलं आहे. त्यामुळे याचा मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारतावर टीका करत आहेत, तर दुसरीकडे भारत मात्र सावध भूमिका घेत असल्याचं दिसत आहे.

या सर्व घडामोडींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस टीका करत आहे. ट्रम्प हे एकीकडे सातत्याने भारतावर टीका करत आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर पुन्हा अमेरिकेला भेट देणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत असीम मुनीर पुन्हा अमेरिकेला भेट देणार असल्याच्या चर्चांमुळे वेगवेगळे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

दरम्यान, यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसने अप्रत्यक्ष टीका केली आहे. ‘असीम मुनीर अमेरिकेचे लाडके बनले आहेत’, असं म्हणत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी घणाघाती टीका केली आहे. जयराम रमेश यांनी म्हटलं की, “२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटने दरम्यान जे सातत्याने वादग्रस्त विधाने करत होते ते असीम मुनीर आता अमेरिकेचे लाडके बनले आहेत. मात्र, दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी विशेष मैत्री असल्याचा दावा करत होते, ते आता कुठे आहेत”, असं त्यांनी म्हटलं आहे.

भारताचं अमेरिकेला सडेतोड उत्तर

ट्रम्प यांनी अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्काची घोषणा केल्यानंतर भारताने अमेरिकेला ठणकावलं आहे. अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याची टिप्पणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर (ट्विटर) केली आहे. जयस्वाल म्हणाले, ट्रम्प यांची ही कृती अन्यायकारक व अवास्तव आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक सर्व पावलं उचलेल. दरम्यान, त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या अरेरावीला संयमी उत्तर दिलं आहे. मोदी म्हणाले, “भारत आपल्या शेतकऱ्यांच्या, पशूपालकांच्या, मच्छिमारांच्या हिंतांबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही.” मोदी यांची ही टिप्पणी थेट वॉशिंग्टनसाठी संदेश असल्याचं मानलं जात आहे.