Asim Munir Nuclear Threat To India: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता. यानंतरही पाकिस्तानकडून भारताविरोधात गरळ ओकणे सुरूच आहे. आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा धमकी दिली आहे. असीम मुनीर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी म्हटले आहे की, जर पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले तर ते अणुयुद्ध करतील. पण ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, भारत आता अणुयुद्धाच्या कोणत्याही धमक्यांना ऐकणार नाही आणि कोणत्याही दहशतवादी घटनेला युद्धाचे कृत्य मानले जाईल.
द प्रिंटच्या वृत्तानुसार, असीम मुनीर अमेरिकेत एका चहापान कार्यक्रमात उपस्थित होते, जिथे त्यांनी भारताला धमकी दिली. असीम मुनीर म्हणाले की, सिंधू जल करार स्थगित करून भारताने २५ कोटी लोकांना उपासमारीच्या धोक्यात आणले आहे. ते म्हणाले की, आम्ही भारत धरण बांधण्याची वाट पाहू आणि जेव्हा ते बांधले जाईल, तेव्हा आम्ही ते १० क्षेपणास्त्रांनी उडवून देऊ.
असीम मुनीर म्हणाले की, सिंधू नदी ही भारतीयांची वडिलोपार्जित मालमत्ता नाही आणि त्यांच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही. या कार्यक्रमात कोणत्याही पाहुण्याला मोबाईल फोन किंवा डिजिटल उपकरणे घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. द प्रिंटच्या वृत्तानुसार, त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांशी बोलून हे वृत्त दिले आहे.
अर्धे जग आपल्यासोबत घेऊन बुडू
व्यापारी आणि मानद वाणिज्यदूत अदनान असद यांनी टाम्पा येथे आयोजित केलेल्या ब्लॅक-टाय डिनरमध्ये मुनीर उपस्थितांना म्हणाले की, “आपण एक अणुशक्ती-संपन्न राष्ट्र आहोत. जर आपल्याला वाटले की आपण बुडत आहोत, तर आपण अर्धे जग आपल्यासोबत घेऊन बुडू.”
जूननंतर दुसऱ्यांदा अमेरिका दौरा
यापूर्वी मुनीर यांनी जूनमध्ये पाच दिवसांचा अमेरिका दौरा केला होता. त्यानंतर ते दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. जूनमधील दौऱ्यात मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत एका खाजगी स्नेहभोजन कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्या भेटीमुळे अमेरिका-पाकिस्तान सहकार्य वाढविण्याच्या घोषणा झाल्या, ज्यामध्ये तेल कराराचाही समावेश आहे.
पाकिस्तानी लष्करी अधिकारीही बरळला
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराचे मीडिया प्रमुख लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी ब्रिटिश वृत्तपत्र द इकॉनॉमिस्टला दिलेल्या मुलाखतीत भारताला धमकी दिली होती. त्यांनी म्हटले होते की, पाकिस्तान कुठूनही भारताला लक्ष्य करू शकतो. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्यास पूर्वेकडून सुरुवात करेल.
ऑपरेशन सिंदूर
दरम्यान, २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. यामध्ये पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. तेव्हापासून पाकिस्तान घाबरला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतरही त्यांनी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याने सर्व हल्ले हाणून पाडले आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.