पीटीआय, इस्लामाबाद
सध्या निष्क्रिय असलेल्या दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेची (सार्क) जागा घेणारा नवा प्रादेशिक राष्ट्रगट तयार करण्यासाठी पाकिस्तान आणि चीन प्रयत्न करत आहेत, असे वृत्त पाकिस्तानातील ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ या वर्तमानपत्राने सोमवारी दिले. चीनच्या कन्मिंग येथे चीन, पाकिस्तान व बांगलादेशदरम्यान त्रिपक्षीय चर्चेत हाही विषय असल्याचे वृत्त आहे.

या घडामोडींशी संबंधित सूत्रांचा हवाला देऊन ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने आपल्या वृत्तात नमूद केले आहे की, नव्या राष्ट्रगटाच्या स्थापनेसाठी पाकिस्तान आणि चीनदरम्यानची चर्चा प्रगत टप्प्यावर आहे. प्रादेशिक अखंडता आणि दळणवळणासाठी सार्कची जागा घेणाऱ्या नव्या राष्ट्रगटाची गरज आहे यावर दोन्ही देशांचे एकमत आहे. ‘सार्क’मध्ये भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, भूतान, मालदीव, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेचा समावेश आहे.

‘सार्क’च्या इतर सदस्य देशांनाही नव्या राष्ट्रगटात सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीनेच चीनमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश यांच्याबरोबर चर्चा झाल्या आहेत. मात्र, बांगलादेश, चीन आणि पाकिस्तानदरम्यान कोणतीही आघाडी होण्याची शक्यता बांगलादेशच्या हंगामी सरकारने फेटाळून लावली आहे. सूत्रांनी ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ला दिलेल्या माहितीनुसार, या नव्या राष्ट्रगटामध्ये सहभागी होण्यासाठी भारताला आमंत्रित केले जाईल.

‘सार्क’ ११ वर्षांपासून निष्क्रिय

‘सार्क’ची अखेरची द्वैवार्षिक शिखर परिषद २०१४मध्ये काठमांडू येथे झाली होती. पुढील परिषद २०१६मध्ये इस्लामाबाद येथे होणार होती. मात्र, त्या वर्षी उरीमध्ये लष्कराच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने परिषदेत सहभागी होण्यास असमर्थता दर्शवली. त्यापाठोपाठ बांगलादेश, भूतान आणि अफगाणिस्ताननेही सहभागास नकार दिल्याने परिषद अखेर रद्द करण्यात आली होती. त्यानंतर ‘सार्क’ची परिषद झालीच नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुनीर यांच्याकडून दहशतवादाची भलामण

जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद हा विधिवत संघर्ष असल्याचा दावा पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी केला आहे. या संघर्षात पाकिस्तान नेहमीच काश्मिरी जनतेबरोबर असेल असेही ते म्हणाले. स्वातंत्र्यासाठी वैध आणि कायदेशीर लढ्याला आंतरराष्ट्रीय कायद्याची मान्यता आहे असा दावाही मुनीर यांनी केला. यापूर्वीही त्यांनी काश्मीर ही पाकिस्तानच्या कंठातील रक्तवाहिनी असल्याचे म्हटले होते. भारताने पुन्हा हल्ला केल्यास उत्तर देण्याची धमकीही त्यांनी दिली.