Pakistan Condemns US Strikes On Iran : इस्रायल-इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसून येत आहे. इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांकडून हवाई हल्ले करण्यात येत आहेत. यादरम्यान अमेरिकेन देखील या संघर्षात उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले करून फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानमधील तीन अणु प्रकल्पांना लक्ष्य केले आहे. यानंतर आता पाकिस्तानने रविवारी या अणु प्रकल्पांव अमेरिकेच्या या हल्ल्यांचा निषेध केला आहे. हे हल्ले करून अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले असून इराणला स्व-रक्षणाचा हक्क असल्याचेही म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांचे नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवले होते, यानंतर आता हे विधान करण्यात आले आहे. “इस्रायलच्या हल्ल्यांच्या मालिकेनंतर इराणी अणु प्रकल्पांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांचा पाकिस्तान निषेध करतो. या प्रदेशातील तणाव आणखी वाढण्याच्या शक्यतेमुळे आम्ही गंभीर चिंतेत आहोत,” असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

पश्चिम अशियात वाढलेला तणाव हा अत्यंत विचलित करणारा असल्याचे तसेच हा तणाव आणखी वाढल्यास या प्रदेशासाठी आणि त्याच्याही पलीकडे याचे गंभीर हानिकारक परिणाम होतील असेही पाकिस्तानने म्हटले आहे.

“आम्ही नागरिकांच्या जीविताचा आणि त्यांच्या मालमत्तेचा आदर राखण्याची आणि संघर्ष तात्काळ थांबवण्याची गरज अधोरेखित करतो. सर्व पक्षांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन केलेच पाहिजे, विशेषतः आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांचे. संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरमधील तत्व आणि आणि उद्धेश यांच्या माध्यमातून होणारी चर्चा, डिप्लोमसी याच एकमेव मार्गाने प्रादेशिक संकटे सोडवली जाऊ शकतात,” असेही त्यांनी म्हटले आहे.

इराण आणि पाकिस्तान हे खूप जवळचे सहकारी राहिले आहेत. या दोन्ही देशांच्या सीमा लागून आहेत, तसेच या दोन्हींचा वारसा इस्लामिक राहिला आहे. इराण प्रमाणेच पाकिस्तान देखील इस्रायलचा विरोध करत आला आहे. पाकिस्तानकडून वारंवार इस्रायलकडून गाझामध्ये होणाऱ्या हल्ल्यांविरोधात तसेच वेस्ट बँकचा ताबा घेण्याविरोधात वक्तव्य करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानसाठी लाजिरवाणी बाब

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. तसेच पाकिस्तान कडून ट्रम्प यांना शांततेचा नोबल पुरस्कार दिला जावा असेही सुचवण्यात आले होते. पण याच्या काही दिवसांतच अमेरिकेने पाकिस्तानचे मित्र राष्ट्र असलेल्या इराणवर रविवारी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हे एकप्रकारे पाकिस्तानसाठी लाजिरवाणे ठरले आहे.