Pakistan Defence Minister On wheather Saudi Arabia back Pakistan in war against India : सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात दोन दिवसांपूर्वी ऐतिहासिक परस्पर संरक्षण करार झाला आहे. या करारात, या दोन्ही पैकी कोणत्याही एका देशावर आक्रमण झाले तर ते दोन्ही देशांविरोधातील आक्रमण मानले जाईल, अशी तरतूद आहे. यादरम्यान जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध पेटले तर सौदी अरेबिया युद्धात सहभागी होणार का? याबद्दल पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी मोठे विधान केले आहे

जर भारताने पाकिस्तानविरोधात युद्ध पुकारले तर सौदी अरेबिया पाकिस्तानचे संरक्षण करेल असे विधान शुक्रवारी इस्मामाबाद येथे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. एनडीटीव्हीने यासंबधीचे वृत्त दिले आहे. “हो, नक्कीच. यात काहीच शंका नाही…” असे आसिफ यांनी ‘जिओ टीव्ही’ या पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी नाटो करारातील कलम ५ बरोबर असलेली या कराराचे सारखेपणा देखील त्यांनी नमूद केला, ज्यामध्ये कलेक्टिव्ह डिफेन्सबद्दल सांगण्यात आले आहे. म्हणजेच एका सदस्य राष्ट्रावर झालेला लष्करी हल्ला हा सर्व सदस्य राष्ट्रांवर झालेला हल्ला मानला जाईल.

मात्र पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी सौदी अरेबिया बरोबर झालेला करार हा नाटो प्रमाणेच ‘आक्रमक’ ऐवजी ‘संरक्षणात्मक’ असल्यावर यावेळी भर दिला. “जर सौदी अरेबिया किंवा पाकिस्तानवर आक्रमण करण्यात आले, तर आम्ही एकत्रितपणे त्याचा प्रतिकार करू,” असे त्यांनी जिओ टीव्हीशी बोलताना सांगितले.

“आमचा या कराराचा कोणत्याही आक्रमकतेसाठी वापर करण्याचा उद्देश नाही असेही आसिफ यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले. “पण जर धोका निर्माण झाला, तर नक्कीच ही व्यवस्था कार्यान्वित होईल,” असेही आसिफ यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानची अण्वस्त्रे सौदी अरेबियाच्या वापरासाठी उपलब्ध असतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गुरुवारी रात्री उशिरा दूरचित्रवाणी मुलाखतीत बोलताना आसिफ म्हणाले, की ‘पाकिस्तानच्या अण्वस्त्र क्षमतेबद्दल मी एक मुद्दा स्पष्ट करतो, जेव्हा आम्ही चाचण्या केल्या तेव्हाच ही क्षमता सिद्ध झाली. तेव्हापासून आमच्याकडे युद्धभूमीसाठी प्रशिक्षित सैन्य आहे.’ ‘आमच्याकडे जे आहे आणि आमच्याकडे असलेल्या क्षमता या करारानुसार (सौदी अरेबियाला) उपलब्ध करून दिल्या जातील,’ असेही ते म्हणाले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे रियाध दौऱ्यावर असताना पाकिस्तान आणि सौदी यांच्यात परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारातील एक महत्त्वाचे कलम असे आहे की, “कोणत्याही एका देशावर झालेले आक्रमण हे दोन्ही देशांवर झालेले आक्रमण मानले जाईल.”

सौदी अरेबियाचे युवराज महंमद बिन सलमान अब्दुलाझिझ अल सौद आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दोन्ही देशांतील सामरिक संरक्षण करारावर बुधवारी स्वाक्षऱ्या केल्या. विश्लेषकांच्या मते, पश्चिम आशियातील एकमेव अण्वस्त्रधारी देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इस्रायलला एक संदेश म्हणून हा करार करण्यात आला आहे.