Hafiz Saeed Gets Security: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताकडून आमच्यावर लष्करी कारवाई केली जाऊ शकते, अशी भीती पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्तातुल्लाह तरार यांनी व्यक्त केली होती. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानला कोवर्ट ऑपरेशनची भीती वाटत आहे. यामुळेच लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईदला चार पट अधिक सुरक्षा पुरविण्यात आली आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने स्वतःचे हात झटकले. मात्र दहशतवादाचा बिमोड करण्याचा निर्धार भारताने केलेला असून आंतरराष्ट्रीय कोंडीपासून लष्करी कारवाई करण्यापर्यंतचे विविध पर्याय चाचपण्यात येत आहेत. यामुळेच लाहोरमधील मोहल्ला जोहर टाउन या दाट लोकवस्तीच्या निवासी भागात हाफिज सईदच्या घराबाहेर आता सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे लष्कर, आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाशी संबंधित संघटनांनी सुरक्षेची जबाबदारी संयुक्तपणे उचलली आहे. तसेच घराच्या परिसरात ड्रोनची पाळत ठेवली जात असून घरापासून चार किलोमीटरच्या परिघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. हाफिज सईद राहत असलेल्या इमारतीजवळ कोणत्याही नागरिकांच्या हालचालींना बंदी घालण्यात आली आहे. या परिसरात ड्रोन उडविण्यासही निर्बंध घालण्यात आले आहेत.
लष्कर-ए-तैयबाची उपसंघटना असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ)ने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती, त्यानंतर लगेचच हाफिज सईदच्या घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली असल्याचे इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. टीआरएफने जरी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असली तरी या हल्ल्यामागे हाफिज सईदची मुख्य भूमिका असावी, असा भारतीय यंत्रणांचा कयास आहे. पहलगाम हल्ल्यानंतर उभय राष्ट्रात पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेने हाफिज सईदला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेले असताना आणि अमेरिकेने त्याच्यावर १० दशलक्ष डॉलर्सचा बक्षीस ठेवलेले असतानाही तो पाकिस्तानात बिनबोभाटपणे राहत आहे. लाहोरमधील दाटीवाटीच्या नागरी वस्तीत हाफिज सईद लपून बसला असल्याचे सांगितले जाते.
७७ वर्षीय हाफिज सईद हा लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक असून २००८ साली मुंबईवर झालेल्या बॉम्बस्फोटाचा प्रमुख सूत्रधार आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने बुधवारी हाफिज सईदचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याला संपविण्याची धमकी दिली आहे. आणखी एका वृत्तानुसार हाफिज सईद हा पाकिस्तानच्या कथित कोठडीत असल्याचे सांगितले जाते. दहशतवाद्यांना वित्तपुरवठा केल्याच्या आरोपाखाली तो ४६ वर्षांची शिक्षा भोगत आहे.