पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या मुलाने एक मोठा आरोप केला आहे. आपल्या वडिलांना तुरूंगात विष देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्या मुलानं केला आहे. नवाझ शरीफ हे सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली लाहोरमधील कोट लखपत तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या शरीरातील रक्तपेशी कमी झाल्यानं त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे.
आपल्या वडिलांविरोधात कट रचला जात असल्याचा आरोप नवाझ शरीफ यांचा मुलगा हुसेन नवाझ यानं केला आहे. जर नावाझ शरीफ यांच्या प्रकृतीला काही झालं तर त्याचं जबाबदार कोण असेल हे तुम्हाला ठाऊक आहे. हे त्यांना विष दिल्याचं लक्षण आहे, असा आरोप हुसेन नवाझ यांनी ट्विटरवरून केला आहे. ते सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉननं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. नवाझ शरीफ यांच्या वैद्यकीय अहवालानुसार त्यांच्या रक्तपेशी १६ हजारांवरून २ हजारांवर आल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
सोमवारी रात्री त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना त्वरित रक्तपेशी देण्यात आल्या. त्यानंतर मंगळवारी त्यांचे भाऊ शाहबाज शरीफ यांनीदेखील त्यांची भेट घेतली. आज मी माझ्या भावाची भेट घेतली. त्यांची प्रकृती खालावली असून त्यांची चिंता होत आहे. सरकारनंही त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष दिलं पाहिजे. मी त्यांच्या प्रकृतीसाठी संपूर्ण देशाला प्रार्थना करण्याची विनंती करतो, अशा आशयाचं ट्विट त्यांनी भेटीनंतर केलं होतं. दरम्यान, त्यांच्या शरीरातील रक्तपेशींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालं असल्याची प्रतिक्रिया त्यांचे खासगी डॉक्टर अदनान मलिक यांनी दिली.