Khawaja Asif : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हे कोणत्या न कोणत्या कारणांवरून कायम चर्चेत असतात. ख्वाजा आसिफ यांच्या विधानांवरून पाकिस्तानमध्ये अनेकदा वादाला तोंड फुटल्याचंही पाहायला मिळालं आहे. आता ख्वाजा आसिफ यांनी त्यांच्याच देशातील नोकरशाहीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानमधील नोकरशाही भ्रष्टाचारात बुडाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या विधानावरून पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.
संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे की, “देशातील अर्ध्या पेक्षा जास्त उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी पोर्तुगालमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे आणि हे अधिकारी तेथील नागरिकत्व घेण्याच्या तयारीत आहेत. नोकरशहांनी अब्जावधी डॉलर्स काळा पैसा इस्लामाबादवरून पोर्तुगालला हलवला आहे. हे अब्जावधी रुपये खाऊनही आरामात निवृत्तीचं जीवन जगत आहेत”, असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं. या संदर्भातील त्यांनी एक पोस्ट एक्सवर (ट्विटर) शेअर केली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
दरम्यान, ख्वाजा आसिफ यांनी एक मोठा दावा केला आहे. माजी मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याच्या मुलीच्या लग्नात ४ अब्ज रुपयांची भेट स्वीकारली आणि त्यानंतर शांतपणे निवृत्त झाले. हे लोक एकेकाळी महत्वाच्या पदावर अधिकारी होते आणि आता ते त्यांच्या भ्रष्टाचाराच्या शिक्षेपासून दूर आणि आरामात जीवन जगत आहेत”, असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं.
ख्वाजा आसिफ पुढे असंही म्हणाले की, “अधिकारी सर्वाधिक भ्रष्टाचार करतात. मात्र, दोष राजकारण्यांना दिला जातो. राजकारण्यांना परदेशात जमीन मिळत नाही आणि नागरिकत्वही मिळत नाही. ते त्यांचं संपूर्ण आयुष्य निवडणुका लढण्यात आणि जनतेला तोंड देण्यात घालवतात. खरी लूट तर नोकरशहा करतात. राजकारण्यांना फक्त तेच मिळतं जे त्यांच्यापासून सुटतं. तरीही राजकारण्यांना प्रत्येक गोष्टीसाठी दोषी ठरवलं जातं. त्यामुळे ही नोकरशाही पाकिस्तानच्या भूमीला प्रदूषित करत आहे”, असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी याआधीही अनेक वादग्रस्त विधान केलेले आहेत. दरम्यान, ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या या विधानावरून पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचार किती खोलवर रुजलेला आहे? याबाबत आता अनेकांनी तर्कवितर्क लावण्यास सुरूवात केली आहे.