नवी दिल्ली : भारतासाठी ‘मोस्ट वाँटेड’ असलेल्या हफीझ सईद व मसूद अझहर यांच्यासारख्या संयुक्त राष्ट्रांच्या यादीतील दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याचे पाकिस्तानने पुन्हा दाखवून देण्याचे आवश्यक असल्यामुळे तो देश आर्थिक कारवाई कृती दलाच्या (एफएटीएफ) करड्या यादीत कायम राहील, असे दहशतवादाला होणाऱ्या वित्तपुरवठ्याविरुद्ध काम करणाऱ्या या जागतिक संघटनेने गुरुवारी सांगितले.

तुर्कस्तान, जॉर्डन व माली यांचाही ‘करड्या यादीत’ समावेश करण्यात आला असून, मॉरिशस व बोट्सवाना यांची नावे यादीतून हटवण्यात आली आहेत, असे फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सचे (एफएटीएफ) अध्यक्ष मार्कस प्लेयर यांनी पॅरिस येथून आभासी पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले. पाकिस्तान अजूनही ‘वाढीव देखरेख यादीत’ (इनक्रीज्ड मॉनिटरिंग लिस्ट) राहणार असल्याचे ते म्हणाले. ‘करड्या यादीचे’ हे दुसरे नाव आहे.

संयुक्त राष्ट्रांत भारताची पाकिस्तानवर टीका

भारताविरुद्ध संयुक्त राष्ट्रांच्या एका व्यासपीठावर पुन्हा ‘खोटा आणि द्वेषपूर्ण’ प्रचार केल्याबद्दल भारताने गुरुवारी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. या ठिकाणी पाकिस्तानने त्याचा जवळचा मित्र असलेल्या चीनच्या झिनजियांगमध्ये ‘वांशिक व धार्मिक अल्पसंख्याकांचे’ संरक्षण होत असल्याचे मत व्यक्त केले होते.

सामाजिक, मानवीय आणि सांस्कृतिक मुद्द्यांची चर्चा करणाऱ्या संयुक्त राष्ट्र सर्वसाधरण सभेच्या तिसऱ्या सभेच्या बैठकीत पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने पुन्हा जम्मू-काश्मीरचा मुद्दा काढल्यानंतर भारताच्या प्रतिनिधींनी आपले विचार मांडले.