गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय महानाट्याचा अंक सोमवारी पंतप्रधानपदी शेहबाज शरीफ यांच्या निवडीनं संपला. इम्रान खान यांचं सरकार अल्पमतात आल्यानंतर विश्वासदर्शक ठराव हरलं आणि इम्रान खान यांना पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर नवाज शरीफ यांचे बंधू शेहबाज शरीफ यांची सार्वमताने पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. मात्र, यामध्ये इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षानं सहभाग घेतला नाही. उलट, त्यांच्या पक्षाच्या एका खासदारानं चक्क संसदेचं अधिवेशन सुरू असतानाच सेल्फी व्हिडीओ काढून त्यात शेहबाज शरीफ यांचा भिकारी असा उल्लेख केला!

नेमकं झालं काय?

पाकिस्तानच्या संसदेतला एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ संसदेच्या सरकारी प्रक्षेपणातला नसून एका सदस्यानं भर सभागृहात अधिवेशन सुरू असताना काढलेला सेल्फी व्हिडीओ आहे. या सदस्याचं नाव फहीम खान असून ते इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे सदस्य आहेत. पंतप्रधानपदी शेहबाज खान यांची निवड झाल्यानंतर इम्रान खान यांच्या पक्षानं सर्व सदस्य राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं. या घडामोडींचा निषेध म्हणून फहीम खान यांनी संसदेतच सेल्फी व्हिडीओ बनवला.

फहीम खान व्हिडीओत म्हणतायत…

फहीम खान यांनी व्हिडीओमध्ये पाकिस्तानच्या नवनिर्वाचित पंतप्रधानांचा उल्लेख भिकारी असा केला आहे. “मी आत्ता संसदेमध्ये उभा आहे. मी तुम्हारा आंतरराष्ट्रीय भिकारी दाखवणार आहे. हे भिकारी आहेत आणि ते स्वत:च भिकारी आहे. जे समाजाला भिकारी म्हणतात, ते स्वत: भिकारी आहेत”, असं म्हणत फहीम खान यांनी व्हिडीओमध्ये शेहबाज खान यांच्या दिशेने इशारा केला.

दरम्यान, यापुढे जाऊन फहीम खान यांनी नव्याने सत्ताधारी झालेल्या पाक्षांच्या सर्व खासदारांनाच भिकारी म्हटलं आहे. “आम्ही भिकारी नाही, आम्ही स्वाभिमानी लोक आहोत. हे इथे स्वाभिमानी लोक बसले आहेत(तेहरीक-ए-इन्साफचे सदस्य) आणि हे भिकारी बसले आहेत(शेहबाज शरीफ आणि त्यांचे पाठिराखे खासदार)” असं या व्हिडीओमध्ये फहीम खान म्हणताना दिसत आहेत.

पाकिस्तानात नेमकं घडलं काय?

देशातील ढासळत्या अर्थव्यवस्थेसाठी तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांना दोषी ठरवत विरोधकांनी अविश्वास ठराव मांडला. याआधी इम्रान खान यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी आपला पाठिंबा काढल्याने त्यांचं सरकार अल्पमतात आलं होतं. या ठरावावर शनिवारी मतदान घेण्यात आलं. या मतदानात अपेक्षेप्रमाणे इम्रान खान यांचा पराभव झाला आणि शेहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार हे निश्चित झालं. यादरम्यानच, संसदेचं कामकाज होत असतानाच हा व्हिडीओ काढण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.