scorecardresearch

वादग्रस्त ध्वनिफितींचे प्रकरण : इम्रान खान यांच्याविरुद्ध कारवाईचा शहाबाज मंत्रिमंडळाचा निर्णय

पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत असद माजिद यांच्यात पाकिस्तानातील स्थितीबाबत झालेल्या चर्चेची काही कागदपत्रे उघड झाली होती

वादग्रस्त ध्वनिफितींचे प्रकरण : इम्रान खान यांच्याविरुद्ध कारवाईचा शहाबाज मंत्रिमंडळाचा निर्णय
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (संग्रहित छायाचित्र)

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तसेच त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात वादग्रस्त ध्वनीफीतप्रकरणी कारवाई करण्याचा निर्णय शहाबाज शरीफ मंत्रिमंडळाने घेतला आहे. या कथित ध्वनीफितींमध्ये खान हे आपल्याविरोधात कारस्थान असल्याचे दाखवण्यासाठी ‘अमेरिकन सायफर’चा वापर करण्याबाबत बोलत असल्याचा आरोप आहे.

आपल्या राजकीय फायद्यासाठी अमेरिकेवर कसे आरोप केले जाऊ शकतात, याबबात खान आपल्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ (पीयीआय) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना सांगत असल्याच्या दोन ध्वनीफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत. याबाबत नेमलेल्या मंत्रिमंडळ समितीने शनिवारी कथित ध्वनीफितींबाबत कारवाई करण्याची शिफारस सरकारला केली. त्याआधारे मंत्रिमंडळाने केंद्रीय तपास संस्थेला (एफआयए) याची चौकशी करण्याचे आदेश रविवारी दिले.

यावर प्रतिक्रिया देताना खान यांचे सहकारी आणि माजी परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद यांनी सरकारवर आरोप केले. ‘‘सरकारने दिलेले आदेशांवरून आपल्या पक्षाची भूमिकाच योग्य असल्याचे स्पष्ट होते. पाकिस्तानचे नुकसान होईल, असे आमचा पक्ष कधी करणार नाही,’’ असा दावा मेहमूद यांनी केला. 

आरोप काय?

अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री डोनाल्ड लू आणि पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत असद माजिद यांच्यात पाकिस्तानातील स्थितीबाबत झालेल्या चर्चेची काही कागदपत्रे उघड झाली होती. या संभाषणाचा उपयोग करून ‘आपल्याला सत्तेतून हटवणे हे अमेरिकेचे कारस्थान आहे,’ असा आरोप खान यांनी केला होता. याबाबत पक्षनेत्यांना सूचना देणाऱ्या ध्वनीफिती समोर आल्यानंतर ३० सप्टेंबरला मंत्रिमंडळाने समिती नेमली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या