पाकिस्तानमध्ये राजकीय पेचप्रसंग निर्माण झालेला असताना, आता नव्या राजकीय नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. आज (रविवार) पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधाती अविश्वास प्रस्ताव उपसभापती फेटाळला. उपसभापतींनी हा अविश्वास प्रस्ताव संविधान आणि पाकिस्तानच्या नियमांविरुद्ध असल्याचे म्हटले आहे. अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर नॅशनल असेंब्लीचे कामकाज २५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. तर, पंतप्रधान इम्रान खान यांनी संसद बरखास्त करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती, ती मान्य करण्यात आली आहे.

अविश्वास प्रस्ताव फेटाळल्या गेल्यानंतर देशाला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की”सगळ्या जनतेसमोर एक देशद्रोह होत होता, देशद्रोही बसलेले होते आणि षडयंत्र रचलं जात होतं. मी त्यांना संदेश देऊ इच्छितो, अल्लाहचं जनतेकडे लक्ष आहे. अशाप्रकारचं षडयंत्र जनता यशस्वी होऊ देणार नाही. सभापतींनी आज आपल्या अधिकारांचा वापर करून जो निर्णय दिला आहे. त्यानंतर मी आताच राष्ट्रपतींना सूचना पाठवली आहे. की सभागृह विसर्जित करा. एका लोकशाही समाजात आपण लोकशाही जनतेकडे जावं, निवडणुका व्हाव्यात जनता निर्णय घेईल.”

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. डेप्युटी स्पीकर कासिम खान सूरी यांनी परदेशी षडयंत्र असल्याचा आरोप करत यांनी अविश्वास ठराव फेटाळला आणि सभागृहात मतदान होऊ दिले नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधक सर्वोच्च न्यायालयात जाणार –

उपसभापतींच्या या निर्णयाला विरोधकांनी कडाडून विरोध केला. बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. हा पाकिस्तानच्या जनतेशी केलेला विश्वासघात असल्याचे ते म्हणाले. उपसभापतींच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे भुट्टो यांनी सांगितले.