India – Pakistan conflict Erase From Map warning : “दहशतवादाला खतपाणी घालणं थांबवा, अन्यथा नकाशावरून मिटवू”, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला होता. यावर आता पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी लष्कराने म्हटलं आहे की “आमचं सैन्य शत्रूच्या घरात घुसून लढाई करण्यास सक्षम आहे.” पाकिस्तानी लष्कराने यासंदर्भात एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की “भारताचे संरक्षण मंत्री, लष्करप्रमुख व हवाईदलाच्या प्रमुखांनी चिथावणीखोर वक्तव्ये केली आहे. मात्र, त्यांना माहिती असायला हवं की भविष्यात कुठल्याही प्रकारचा संघर्ष खूप विनाशकारी ठरू शकतो.”

पाकिस्तानी लष्कराने म्हटलं आहे की “शत्रुत्वाचा नवा टप्पा सुरू झाला, पुन्हा एकदा युद्ध सुरू झालं तर पाकिस्तान देखील मागे हटणार नाही. आम्ही कुठलाही संकोच न बाळगता, संयम न राखता जशास तसं प्रत्युत्तर देऊ. नवे पायंडे पाडण्याचा विचार करणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की पाकिस्ताननेही आता नवी पद्धत स्वीकारली आहे. ही पद्धत वेगवान, निर्णायक व विनाशकारी असेल.”

“पाकिस्तानी लष्कराकडे भारतात घुसून लढण्याची ताकद”

अधिकृत निवेदनात पाकिस्तानने म्हटलं आहे की “अनावश्यक धमक्या आणि कारण नसताना केलेल्या हल्ल्यांना तोंड देताना, पाकिस्तानचे लोक, सशस्त्र सेना शत्रूच्या प्रदेशात लढण्याची क्षमता व दृढनिश्चय बाळगून आहे. भारतात घुसून लढण्याची ताकद पाकिस्तानी लष्कराकडे आहे. या वेळी आम्ही भौगोलिक सीमांमागील धारणा मोडून काढू आणि देशाच्या (भारताच्या) सर्वात दुर्गम भागांत घुसू. पाकिस्तानला नकाशावरून हटवण्याच्या बाबतीत भारताने समजून घेतलं पाहिजे की अशा परिस्थितीचा परिणाम दोन्ही बाजूंना भोगावा लागेल.”

भारताने नेमकं काय म्हटलं होतं?

ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताची पाकिस्तानविरुद्धची भूमिका आणखी कठोर झाली आहे. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी (३ ऑक्टोबर) गंगानगरमधील घडसाणातील गावांना भेट दिली आणि येथून पाकिस्तानला इशारा दिला की “पाकिस्तानला नकाशावर दिसायचं असेल तर त्यांना दहशतवाद्यांना मदत करणं थांबवावं लागेल.”

ऑपरेशन सिंदूरचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा भारताचा इशारा

द्विवेदी म्हणाले, “पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवलं नाही तर ते नकाशावरून कायमचे पुसले जाऊ शकतात. भारतीय लष्कर पाकिस्तानविरुद्ध संयमाची भूमिका घेणार नाही. पाकिस्तानने दहशतवाद थांबवला नाही तर भारत ऑपरेशन सिंदूरचा दुसरा टप्पा सुरू करेल. ऑपरेशन सिंदूर १.० दरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या कारवाईत अनेक पाकिस्तानी जवान व अनेक दहशतवादी मारले गेले होते.”