पीटीआय, नवी दिल्ली : आपल्याला पाकिस्तानसोबत सामान्य शेजाऱ्यासारखे संबंध हवे आहेत, तथापि अशा संबंधांसाठी दहशत व शत्रुत्वमुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पाकिस्तानवर आहे, असे भारताने गुरुवारी सांगितले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सल्लागाराने भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापार संबंध पुन्हा सुरू करण्याचे समर्थन केल्याबद्दल माध्यमांनी प्रकाशित केलेल्या वृत्ताबाबत विचारणा केली असता परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी राज्यसभेत हे प्रतिपादन केले.

‘भारताला पाकिस्तानसोबत सामान्य शेजारसंबंध ठेवण्याची इच्छा असून, दोन्ही देशांतील कुठलेही मुद्दे दोन्ही पक्षांच्या सहभागाने, तसेच दहशत, शत्रुत्व आणि हिंसाचारमुक्त वातावरणात सोडवले जावेत, अशी सरकारची सतत भूमिका राहिलेली आहे,’ असे मुरलीधरन म्हणाले. अशा प्रकारचे पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला प्रतिसाद म्हणून भारताच्या लढाऊ विमानांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये शिरून तेथील जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केला होता. यानंतर दोन्ही देशांतील संबंध तणावपूर्ण झाले. ऑगस्ट २०१९ मध्ये भारताने जम्मू- काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर हे संबंध आणखी बिघडले. यानंतरच पाकिस्तानने भारतासोबतचा द्विपक्षीय व्यापार स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला होता.