प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याभोवती सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक नवीन अहवाल समोर आला आहे. निलंबित भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पाकिस्तान पुन्हा एकदा सोशल मीडियाचा वापर करून भारताची बदनामी करत आहे.
७ हजार १०० पेक्षा जास्त सोशल मीडियावरच्या खात्यांचा सामावेश
डिजिटल फॉरेन्सिक्स रिसर्च अँड अॅनालिटिक्स सेंटर (DFRAC) ने याबाबत एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार सोशल मीडियावर ६० हजार ०२० ही वेगवेगळ्या राष्ट्रांमधील ओळख न पटलेली खाती होती तसेच पाकिस्तानमधील ७ हजार १०० पेक्षा जास्त सोशल मीडियावरच्या खात्यांचा यात सामावेश आहे.
भारताचा बहिष्कार हा ट्रेंड
डीएफआरएसीच्या अहवालानुसार, ओमानच्या ग्रँड मुफ्तींनी भारतीय उत्पादनावर बहिष्कार घातल्याची घोषणा पाकिस्तानी आर्य न्यूजसह अनेक मीडिया हाऊसने चुकीची बातमी चालवली होती. तथापि, त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावरील टिप्पणीवर टीका केली होती आणि सर्व मुस्लिमांना त्याविरोधात एकजूट होण्यास सांगितले होते. पण, त्यांनीच भारताचा बहिष्कार हा ट्रेंड सुरू केल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.
इंग्लिश क्रिकेटर मोएन अलीच्या नावाचा एक बनावट स्क्रीनशॉटही व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते आयपीएलवर बहिष्कार घालण्याबाबत बोलत आहे. काही सर्वात सामान्यपणे वापरले जाणारे हॅशटॅग #Stopinsulting_ProphetMuhammad, #boycottindianproduct होते.
इंडोनेशिया, सौदी अरेबिया, यूएई, जॉर्डन, बहरीन, मालदीव, ओमान, अफगाणिस्तान, कुवेत, कतार आणि इराणसह अनेक देशांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल शर्मा यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. तर इराण, तसेच कतार, प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या नेत्यांविरुद्ध भारत सरकारच्या कृतींबद्दल ते समाधानी असल्याची विधाने जारी केली आहेत.
काश्मीर मुद्दाबाबतही अफवा
तथापि, खालेद बेदौन, मोइनुद्दीन इब्न नसरुल्लाह आणि अली सोहराब या सार्वजनिक व्यक्तींना द्वेष आणि जातीयवाद पसरवण्याची आणखी एक संधी मिळाली. खालेद बेदौनने #BoycottIndianProduct या हॅशटॅगसह पोस्ट करणे सुरू केले आणि काश्मीरचा मुद्दा देखील मधेच ओढला. नुपूर शर्मांनी एका टीव्ही डिबेटमध्ये केलेल्या वक्तव्यावर देशभरात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका झाली होती. वाद पेटल्यानंतर भाजपाने नुपूर शर्मा यांचे सदस्यत्व निलंबित केले आणि नवीन जिंदाल यांचीही हकालपट्टी केली आहे.
