Pakistan And Saudi Arabia Signed Major Mutual Defence Agreement: पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या रियाध दौऱ्यादरम्यान सौदी अरेबिया आणि पाकिस्तानने परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारातील एक कलमामध्ये अशी तरतूद आहे की, “कोणत्याही एका देशाविरुद्ध केलेले कोणतेही आक्रमण हे दोन्ही देशांविरुद्धचे आक्रमण मानले जाईल”.

दोन्ही देशांनी एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानचे पंतप्रधान काल सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून रियाधला दौऱ्यावर आहे. सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी रियाधमधील अल-यामाह पॅलेसमध्ये शरीफ यांची भेट घेतली.

बंधुता आणि इस्लामिक…

या निवदेनात म्हटेल आहे की, “परस्पर संरक्षण करार सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधील जवळपास आठ दशकांपासूनच्या ऐतिहासिक भागीदारीवर आधारित आहे. हा करार “बंधुता आणि इस्लामिक एकतेच्या बंधनावर तसेच दोन्ही देशांमधील सामायिक धोरणात्मक हितसंबंधांवर आणि संरक्षण सहकार्यावर आधारित आहे.”

दोन्ही देशांविरुद्ध आक्रमण मानले जाईल

“या करारामुळे दोन्ही देशांची सुरक्षा वाढविण्यासाठी, प्रादेशिक, जगतिक सुरक्षा आणि शांततेसाठी वचनबद्धता दिसून येते. या कराराचा उद्देश दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याचे पैलू विकसित करणे आणि कोणत्याही आक्रमणाविरुद्ध संयुक्त उत्तर देणे हा आहे. करारात असे म्हटले आहे की, दोन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशाविरुद्ध केलेले आक्रमण हे दोन्ही देशांविरुद्ध आक्रमण मानले जाईल.

या बैठकीच्या छायाचित्रात पाकिस्तानचे लष्करप्रमुख, फील्ड मार्शल असीम मुनीर, पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान दिसत आहेत.

भारताची प्रतिक्रिया

या करानंतर भारताने यावर प्रतिक्रिया दिली असून, हा करार दोन्ही देशांमधील दीर्घकालीन संबंध अधोरेखित करतो.

“आम्ही सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात धोरणात्मक परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी झाल्याचे वृत्त पाहिले आहे. याची सरकारला जाणीव आहे. आम्ही या कराराचे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेवर तसेच प्रादेशिक आणि जागतिक स्थिरतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार आहोत. भारताच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आणि सर्व क्षेत्रात व्यापक राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे”, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.”

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. त्यामुळे हा करार महत्त्वाचा मानला जातो.