Pakistan-Saudi Defence Pact 2025 Details: पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील परस्पर संरक्षण करारात इतर अरब देशांचा समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी स्पष्ट केले की, कोणासाठीही दरवाजे बंद नाहीत.
पाकिस्तान-सौदी अरेबिया संरक्षण कारारात आणखी अरब देश सहभागी होऊ शकतात का? या प्रश्नाचे उत्तर देताना आसिफ म्हणाले, “मी लगेचच याचे उत्तर देऊ शकत नाही, परंतु मी निश्चितपणे म्हणेन की दरवाजे बंद नाहीत.”
आसिफ म्हणाले की, ते “नाटोसारखी व्यवस्था” करण्याचे प्रयत्न करत आहेत. या करारात असा कोणताही कलम नाही, ज्यामुळे या करारात इतर कोणत्याही देशाला प्रवेश नाकारण्यात येईल किंवा पाकिस्तान इतर कोणासोबतही अशाच प्रकारचा करार करू शकत नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानही बऱ्याच काळापासून सौदी सैन्याला प्रशिक्षण देत आहे आणि अलीकडील घडामोडी ही त्या सर्वांचा औपचारिक विस्तार आहे.
पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने बुधवारी “सामरिक परस्पर संरक्षण” करारावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये असे घोषित केले आहे की, दोन्ही पैकी कोणत्याही एका देशांवर झालेले आक्रमण दोन्हींविरुद्धचे आक्रमकण मानले जाईल.
या कराराची तुलना नाटो कराराच्या कलम ५ शी केली जात आहे, जो सामूहिक संरक्षणावर केंद्रित आहे. या करारानुसार, पाकिस्तानच्या आण्विक अस्त्रांसह त्यांच्या लष्करी क्षमता, आणीबाणीच्या परिस्थितीत सौदी अरेबियाच्या वापरासाठी उपलब्ध असतील.
दरम्यान, भू-राजकीय विश्लेषक इयान ब्रेमर म्हणाले की, पाकिस्तानी सैन्याशी पुन्हा एकदा सामना झाल्यास, भारताला आता सौदी अरेबियालाही विचारात घ्यावे लागेल.
संयुक्त निवेदनानुसार, पाकिस्तानी नेत्यांच्या सौदी अरेबिया दोऱ्यादरम्यान पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
या कराराच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने “परस्पर हितसंबंध आणि संवेदनशीलता” लक्षात ठेवावी अशी अपेक्षा भारताने शुक्रवारी व्यक्त केली.
“भारत आणि सौदी अरेबियामध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारी आहे जी गेल्या काही वर्षांत बरीच वाढली आहे,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.
“आम्हाला अपेक्षा आहे की, सौदी अरेबिया आमची धोरणात्मक भागीदारी परस्पर हितसंबंध आणि संवेदनशीलता लक्षात ठेवेल”, असे ते म्हणाले.