India Pakistan Tension : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता एक महिना पूर्ण होऊन गेला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर भारताने ६ आणि ७ मे रोजी रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं.

तसेच त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेवर केलेल्या ड्रोन हल्ल्याला देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलं. मात्र, दोन्ही देशातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आणि दोन्ही देशातील तणाव काहीसा कमी झाल्याची परिस्थिती सध्या आहे. असं असलं तरी अद्यापही ऑपरेशन सिंदूरची चर्चा जगभरात सुरु आहे. दरम्यान, अशातच आता भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवरील अमेरिकेच्या संरक्षण विभागाने (डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी) सादर केलेल्या एका जागतिक धोका मूल्यांकन अहवालातून मोठी माहिती समोर आली आहे.

अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर संस्थेने रविवारी जागतिक धोका मूल्यांकन हा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, पाकिस्तान चीनच्या लष्करी आणि आर्थिक पाठिंब्याने आपल्या अण्वस्त्रांचे आधुनिकीकरण करत आहे. तसेच पाकिस्तान भारताकडे अस्तित्वाचा धोका म्हणून पाहतो. तसेच येत्या वर्षासाठी पाकिस्तानी लष्कराच्या सर्वोच्च प्राधान्यांमध्ये प्रादेशिक शेजाऱ्यांबरोबर सीमापार चकमकी आणि त्यांच्या अण्वस्त्र शस्त्रागारांचे सतत आधुनिकीकरण यासह इतर उद्दिष्टांचा समावेश असण्याची शक्यता असल्याचं अहवालात म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

तसेच पाकिस्तान आपल्या अण्वस्त्रांचे आधुनिकीकरण करण्याचे प्रयत्न करत असून अण्वस्त्र सामग्रीची आणि अण्वस्त्र नियंत्रणाची सुरक्षा राखत आहे. पाकिस्तान जवळजवळ काही परदेशी पुरवठादार आणि मध्यस्थांकडून डब्लूएमडी लागू असलेल्या वस्तू खरेदी करतो, असंही अहवालात म्हटलं. तसेच असंही अधोरेखित करण्यात आलं की, पाकिस्तान चीनकडून सामूहिक विनाशकारी शस्त्रे विकसित करण्यासाठी साहित्य आणि तंत्रज्ञान मिळवत आहे. यापैकी काही हस्तांतरण हाँगकाँग, सिंगापूर, तुर्की आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या देशांमधून होण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पाकिस्तानला प्रामुख्याने चीनच्या आर्थिक आणि लष्करी उदारतेचा लाभ होतो. पाकिस्तानी सैन्य दरवर्षी चीनच्या पीएलएबरोबर अनेक संयुक्त लष्करी सराव करतं. ज्यामध्ये नोव्हेंबर २०२४ मध्ये पूर्ण झालेल्या नवीन हवाई सरावाचा समावेश होतो. अहवालानुसार, चीन हा पाकिस्तानचा लष्करी उपकरणांचा मुख्य पुरवठादार असला तरी पाकिस्तानात काम करणाऱ्या चिनी नागरिकांना लक्ष्य करून झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या मालिकेमुळे हे संबंध ताणले गेल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.