आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय; पाकिस्तानला फटकारले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेरगिरी व घातपाती कारवायांच्या आरोपाखाली भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा योग्यच असल्याचा पाकिस्तानचा दावा धुडकावून लावत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या शिक्षेला गुरुवारी स्थगिती दिली. या प्रकरणी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन योग्यरित्या न केल्याबद्दलही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकला फटाकरले. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाबद्दल भारताने समाधान व्यक्त केले आहे.

पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने गेल्या महिन्यात जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर विविध मार्गानी दबाव आणत ही शिक्षा रद्द करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस केंद्र सरकारने याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला. हरीश साळवे यांच्या नेतृत्वाखालील वकिलांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कमपणे मांडली. उभय बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष रॉनी अब्राहम यांच्या अध्यक्षतेखालील ११ न्यायाधीशांच्या पिठाने जाधव यांच्या फाशीची शिक्षा स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. जाधव यांनी इराणमधून बलुचिस्तान प्रांतात प्रवेश केल्यानंतर सुरक्षा दलांनी गेल्या वर्षी ३ मे रोजी त्यांना अटक केली, असा पाकिस्तानचा दावा आहे. मात्र, जाधव हे व्यापारानिमित्त इराणला गेले असताना त्यांचे तेथून अपहरण करण्यात आले, या म्हणण्यावर भारत ठाम आहे. जाधव यांचे प्रकरण हा भारत व पाकिस्तान यांच्यातील तणावाचा सर्वात अलीकडचा मुद्दा ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणाले..

  • भारत व पाकिस्तान ज्या व्हिएन्ना कराराचे १९७७ पासून पालन करत आहेत, त्यानुसार भारताला त्याच्या नागरिकाला राजदूतावासाच्या माध्यमातून संपर्क करू द्यायला हवा होता
  • कुलभूषण जाधव यांच्या अटकेबाबतची परिस्थिती वादग्रस्त आहे. हे प्रकरण आपल्या अधिकारक्षेत्रात येत असल्याने सुनावणी करण्याचा न्यायालयाला पूर्ण अधिकार
  • प्रकरणाची अंतिम सुनावणी होईपर्यंत जाधव यांना फाशी दिली जाऊ नये. तसेच भारतीय दूतांना त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात यावी

पंतप्रधानांची स्वराज यांच्यावर स्तुतिसुमने

जाधव यांच्यासंदर्भातील निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे प्रकरण योग्यरित्या हाताळल्याबद्दल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे कौतुक केले. तर स्वराज यांनीही पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जाधव यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. मोदी यांनी वकील हरीश साळवे यांचेही आभार मानले.

पाकिस्तानचा कांगावा

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतरही पाकिस्तानचा तोरा कायम राहिला. देशाच्या सुरक्षेशी निगडीत प्रकरणांत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अधिकारक्षेत्र मानत नसल्याचा कांगावा पाकिस्तानने केला. भारत आपला खरा चेहरा लपवत असल्याची टीकाही पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan should not execute kulbhushan jadhav till final verdict international court of justice
First published on: 19-05-2017 at 01:17 IST