इस्लामाबाद : पाकिस्तान आणि अमेरिकेने मुख्य दहशतवादी गटांविरोधात द्विस्तरावरील सहकार्य अधिक वाढविण्याचे ठरविले आहे. त्यात ‘आयसिस खोरासन’, ‘तालिबान’ आणि ‘बलूच लिबरेशन आर्मी’ (बीएलए) या गटांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे भारतामध्ये दहशतवादी कुरापती करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचा यात उल्लेख नाही.

पाकिस्तानमधील ‘बीएलए’ संघटनेला परदेशातील दहशतवादी संघटना म्हणून दर्जा अमेरिकेने दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इस्लामाबादमध्ये दहशतवादाविरोधातील द्विस्तरावरील चर्चेत सहकार्य वाढविण्यावर सहमती झाली. संयुक्त राष्ट्रसंघातील पाकिस्तानचे विशेष सचिव नाबील मुनिर, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या दहशतवादाविरुद्ध नीतीचे समन्वयक ग्रेगरी डी. लॉगेर्फो यांनी संयुक्तपणे बैठकीचे नेतृत्व केले.

बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकामध्ये दोन्ही देशांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध लढण्याची कटिबद्धता व्यक्त केली. संयुक्त पत्रकामध्ये ‘बीएलए’, ‘आयसिस-खोरासन’ आणि ‘तेहरिक-ए-तालिबान’ या संघटनांचा उल्लेख आहे. ‘बीएलए’ संघटनेला भारताची फूस आहे, असा आरोप पाकिस्तान करीत आलेला आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेमधील दीर्घ काळापासूनच्या भागीदारीचाही उल्लेख त्यात करण्यात आला आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांविरुद्ध करीत असलेल्या कारवाईवर अमेरिकेने कौतुक केले आहे.

‘बलुचिस्तानमध्ये ५० दहशतवादी ठार’ इस्लामाबादः पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी बलुचिस्तान भागात ५० हून अधिक दहशतवाद्यांना गेल्या चार दिवसांत ठार केले आहे. पाकिस्तानच्या लष्कराने सांगितले, की अफगाणिस्तान सीमेवर ७ ते ११ ऑगस्टदरम्यान अनेक दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. दुसऱ्या एका घटनेत बलुचिस्तानमधील इराणला लागून असलेल्या वाशूक जिल्ह्यात पाकिस्तानच्या सुरक्षा दलांच्या ताफ्यावर बलुचांनी केलेल्या हल्ल्यात नऊ सैनिक ठार झाले. त्यात एका अधिकाऱ्याचाही समावेश होता. इतर सहा जण जखमी झाले. या घटनेवर पाकिस्तानी लष्कराने कुठलेही भाष्य केले नाही.