प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने रविवारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू- काश्मीर येथील पूँछ जिल्ह्यातील मेंधर सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर पाक सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने दारी दाबसी भागातील पिल्ली व नोल चौकीवर गोळीबार केला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले.
दोनच दिवसांपूर्वी (शुक्रवारी) भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार सरताज अझीझ यांच्यात बैठक झाली होती. यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची बैठक होण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. दोन्ही देश नियंत्रण रेषेचा आदर करतील, असाही निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयानंतर अवघ्या दोन दिवसांत पुन्हा पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला.