Amit Shah on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले. याठिकाणी घरांची पडझड तर झालीच शिवाय मोठ्या प्रमाणावर जीवितहानीही झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज या भागाचा दौरा करत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच लोकांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या सीमेवरील अनेक चौक्या उध्वस्त झाल्या आहेत. यापुढे पाकिस्तान पूर्ण माहिती असलेले युद्ध अधिक काळ लढू शकणार नाही.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस जम्मूच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांसह सीमा सुरक्षा दलाला संबोधित केले.
अमित शाह यांनी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांकडून मिळालेल्या अहवालाचा उल्लेख करत म्हटले, “भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या चौक्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांची देखरेख करण्याची व्यवस्था उध्वस्त झाली आहे. ही व्यवस्था पुन्हा उभारण्यासाठी पाकिस्तानला ४ ते ५ वर्षांचा काळ लागू शकतो. ते आता दीर्घकाळ पूर्ण माहिती नसलेले युद्ध लढू शकत नाहीत.”
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारताच्या निवासी भागांवर हल्ला केला. तेव्हा जम्मू फ्रंटियरमधील बीएसएफने पाकिस्तानच्या ११८ हून अधिक चौक्या उध्वस्त केल्या, असेही अमित शाह म्हणाले. ते पुढे म्हणाले, फक्त तीन दिवसांत इतक्या मोठ्या संख्येने चौक्या पूर्णपणे नष्ट करणे किंवा त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणे, हे खूप मोठी गोष्ट आहे.
सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात पूंछमधील अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांतील सदस्यांना नोकरी देण्यात येणार आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात अमित शाह म्हणाले की, पाकिस्तानकडून करण्यात आलेले कृत्य आणि दहशतवाद पाहता यापुढे भारताची सुरक्षा यंत्रणा अधिक मजबुतीने काम करेल.
या संपूर्ण प्रकारामुळे भारताचे संरक्षण धोरण संपूर्ण जगाला दिसले. भारताच्या नागरिकांवर होणारे कोणत्याही प्रकारचे हल्ले सहन केले जाणार नाहीत, असेही यावेळी अमित शाह म्हणाले. तसेच यापुढे कोणताही हल्ला झाल्यास त्याला अधिक अचूकता आणि तीव्रतेने प्रत्युत्तर दिले जाईल, असेही ते म्हणाले.