जम्मू -काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील जंगलांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. एवढे दिवस सुरू असलेली ही चकमक पाहून घुसखोरांना पाकिस्तानी कमांडोनी प्रशिक्षण दिल्याचं स्पष्ट होतंय, असे लष्कर आणि पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या सोमवारपासून सुरू असलेल्या या चकमकीत कनिष्ठ कमिशन्ड ऑफिसरसह (जेसीओ) एकूण नऊ जण शहीद झाले. दरम्यान, ही चकमक जम्मू -काश्मीरमध्ये अलिकडच्या काही वर्षांत भारतीय सैन्यासाठी सर्वात घातक चकमक ठरली आहे. महत्वाचं म्हणजे इथं आतापर्यंत एकही दहशतवाद्याचा मृतदेह सापडलेला नाही. त्यामुळे या चकमकीत एकही दहशतवादी मारला गेला आहे की नाही, हे देखील अस्पष्ट आहे.

पूंछमध्ये आठ-नऊ किलोमीटरच्या या घनदाट जंगलात भारतीय लष्कराने मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. या जंगलाला पूर्णपणे वेढा घालण्यात आला असून अजूनही दोन्ही बाजूंनी तीव्र गोळीबार सुरू आहे. सर्वप्रथम, पुंछच्या डेरा वाली गलीमध्ये १० ऑक्टोबरच्या रात्री दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आणि आमच्या जेसीओसह पाच जवान शहीद झाले. यानंतर, दहशतवाद्यांच्या या गटाच्या शोधात लष्कराचे जवान १४ ऑक्टोबर रोजी पुंछच्या नर खासच्या जंगलात गेले. येथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात पुन्हा दोन जवान शहीद झाले. तर, यावेळी एक जेसीओ आणि एक जवान बेपत्ता झाले होते, या दोघांचे मृतदेह १६ ऑक्टोबर रोजी सापडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ दिवसांपासून भारतीय लष्कराचे हजारो सैनिक पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षित केलेल्या दहशतवाद्यांशी लढत आहेत. त्यात पाकिस्तानी कमांडोचाही समावेश असू शकतो, अशी शक्यता आहे. दरम्यान, लष्करानेही आता एका भागात दहशतवाद्यांना घेरले आहे. ऑपरेशनमध्ये पॅरा कमांडो आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. या कोम्बिंग ऑपरेशनला वेळ लागल्यास चालेल, मात्र, कोणताही जवान शहीद होता कामा नये, अशी लष्कराची भूमिका असल्याचं सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितलं.