पीटीआय, ढाका
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आणि उपपंतप्रधान इशाक दार यांच्या दौऱ्यादरम्यान बांगलादेशकडून १९७१च्या युद्धाशी संबंधित प्रलंबित मुद्दे उपस्थित करण्यात आले. दार यांचा दोन दिवसांचा बांगलादेश दौरा शनिवारी सुरू झाला. रविवारी त्यांनी बांगलादेशच्या हंगामी सरकारचे परराष्ट्र व्यवहाराचे सल्लागार एम तौहिद हुसेन यांची भेट घेतली. दार हे २०१२नंतर बांगलादेशला भेट देणारे पाकिस्तानचे सर्वात वरिष्ठ नेते आहेत.
भारतमित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेख हसीना यांना बांगलादेशचे पंतप्रधानपद सोडावे लागल्यापासून पाकिस्तान त्या देशाशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दार यांचा दौरा हा त्याच प्रयत्नांचा भाग होता. त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर हुसेन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, १९७१च्या घडामोडींसंबंधी देशांनी आपापली भूमिका मांडली. एका दिवसात ५४ वर्षांच्या समस्या सुटतील अशी अपेक्षा करणे चूक ठरेल, असेही तौहिद हुसेन म्हणाले. तर, १९७१शी संबंधित मुद्दे दोन वेळा सोडवले गेले आहेत असे दार म्हणाले.
संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न
- बांगलादेश आणि पाकिस्तानदरम्यान एक करार आणि पाच सांमजस्य करारावर स्वाक्षरी
- द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी ऐतिहासिक मुद्दे चर्चेद्वारे सोडवण्यावरही सहमती
- व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यावर दोन्ही बाजूंनी भर
चर्चेमध्ये आम्ही १९७१च्या घडामोडींसाठी पाकिस्तानने माफी मागणे किंवा खेद व्यक्त करणे, मालमत्तांवरील दावे आणि अडकलेले पाकिस्तानी नागरिक हे प्रलंबित मुद्दे उपस्थित केले. – तौहिद हुसेन, बांगलादेशच्या हंगामी सरकारचे सल्लागार
पहिल्यांदा १९७४मध्ये नवी दिल्ली येथे त्रिपक्षीय चर्चा झाली होती. त्यानंतर तत्कालीन अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी त्यांच्या ढाका भेटीदरम्यान सार्वजनिकरित्या खुल्या मनाने बोलून नरसंहाराचा मुद्दा सोडवला होता. – इशाक दार, परराष्ट्रमंत्री, पाकिस्तान