Pakistani Hindu Couple Died: राजस्थानच्या जैसलमेरजवळ असलेल्या भारत आणि पाकिस्तान सीमारेषेजवळ दोन मृतदेह आढळून आले. हे दोघंही पाकिस्तानात राहणारं हिंदू दाम्पत्य होतं. भारतात यायचं म्हणून त्यांनी बेकायदेशीर रित्या सीमारेषा ओलांडली खरी. पण तहान आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने (Dehydration) या दोघांचा मृत्यू झाला. रवि कुमार (वय १७) आणि शांती बाई अशी मृत्यू झालेल्या पाकिस्तानातील दोन हिंदूंची नावं आहेत. भारतात हे दोघंही बेकायदेशीररित्या आले होते.
पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली?
जैसलमेरचे पोलीस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी ही माहिती दिली की भारत आणि पाकिस्तान सीमा रेषेजवळ आम्हाला दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले. या दोघांचाही मृत्यू तहान आणि भूक या दोन्हीमुळे तडफडून झाल्याची चिन्हं दिसत आहेत. या दोघांचा मृत्यू जिथे झाला तिथे पोलिसांना एक रिकामी कॅन आढळली. पोलिसांना वाटतं आहे की तहान आणि उन सहन न झाल्याने या दोघांचा मृत्यू झाला असावा.
चार महिन्यांपूर्वीच झाला होता दोघांचा विवाह
१७ वर्षीय रवी आणि त्याची पत्नी शांती हे दोघंही पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात असलेल्या मीरपूर या गावाचे रहिवासी होते. चार महिन्यांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं. पाकिस्तानच्या या जोडप्याने आपण आता लग्नानंतर चांगलं आणि स्थैर्य असलेलं आयुष्य सुरु करु हा विचार करुन या दोघांनी पाकिस्तान सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. भारतात हे दोघं बेकायदेशीर पद्धतीने सीमा ओलांडून दाखलही झाले. भारतात येण्यासाठी त्यांनी कायदेशीर मार्ग निवडला होता. पण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव सुरु झाल्याने या दोघांना व्हिसा नाकारण्यात आला. ज्यानंतर या दोघांनी बेकायदेशीर रित्या भारतात प्रवेश केला होता. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. पाकिस्तानच्या या जोडप्याने बेकायदेशीर रित्या सीमा ओलांडण्याचा निर्णय घेतला. ज्यावरुन रवी आणि त्याच्या वडिलांचा बराच वाद झाला. तुम्ही दोघंही असा काही निर्णय घेऊ नका अशी ताकीदही रवीच्या वडिलांनी त्याला दिली होती. पण त्यानंतर आठवड्याभरात हे दोघं सीमा रेषा ओलांडून पाकिस्तानातून भारतात आले.
सीमा ओलांडल्यानंतर काय घडलं?
रवी आणि शांती दोघंही भारतात आल्यानंतर ते वाळवंटात रस्ता चुकले. त्यामुळे या दोघांनाही प्रचंड प्रमाणात तहान लागली आणि ते दोघंही कासावीस लागले. तहान आणि उन्हामुळए आलेली अस्वस्थता यामुळे या दोघांचा जीव गेला. या दोघांचे मृतदेह २८ जून रोजी सापडले. २९ जूनला या मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं. या मृतदेहांसह पाकिस्तानची कागदपत्रं सापडली आहेत. ज्यामध्ये या दोघांचे तपशील आहेत.
दिलीपसिंह ओढा काय म्हणाले?
पाकिस्तान विस्थापित युनियन आणि बॉर्डर पीपल या संस्थेचे जिल्हा समन्वयक दिलीप सिंह ओढा म्हणाले जर या दोघांचे नातेवाईक त्यांचे मृतदेह घेण्यास तयार असतील तर आम्ही ते त्यांना सोपवू इच्छितो. तसंच जर हे मृतदेह पाकिस्तानला पाठवले गेले नाहीत तर आम्ही त्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करु अशीही माहिती त्यांनी दिली आहे.