आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर या तरुणीची उत्तर प्रदेश एटीएसने चौकशी केली आहे. सीमा हैदर गुप्तहेर असल्याचं म्हटलं जातंय. या अनुषंगाने एटीएसने सीमा हैदर आणि तिचा भारतीय प्रियकर सचिन मीना याची चौकशी केली.

ग्रेटर नोएडातील उजव्या विचारसणीच्या गटाने सीमा हैदरला २४ तासांच्या आत भारतातून हकलून द्या, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ISI च्या संशयित एजंटला युपी एटीएसने लखनौ येथून अटक केली आहे. शेजारील देशाला संरक्षण संस्थांमधील महत्त्वाची माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली. त्यानंतरच, सीमा हैदर हिची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा >> VIDEO: “हा पाकिस्तान नाही भारत आहे” सीमा हैदरचा बंद खोलीतील व्हिडीओ व्हायरल; नेटकरी संतापले

पाकिस्तानातून भारतात येण्याकरता सीमाकडे कोणताही व्हिजा नव्हता. नेपाळमार्गे ती अवैधरित्या भारतात आली आहे. त्यामुळे सीमेवरील पोलीस कर्मचाऱ्यांकडून कोणतीही तपासणी न करता ती भारतात कशी आली, हे शोधण्यासाठी गुप्तचर संस्थेने एसएसबीकडून (Sashastra Seema Bal) अहवाल मागवला आहे. तसंच, युपी पोलिसांकडूनही अहवाल मागवला आहे. कारण, ती उत्तर प्रदेशच्या सीमेवरून भारतात आली आणि ती बरेच दिवस आपल्या जोडीदारासोबत अवैधरित्या राहत होती.

भारतात येण्यासाठी तिने कोणता मार्ग स्वीकारला, ती भारतात कशी आली, विविध देशांच्या प्रवासादरम्यान तिने वापरलेले मोबाईल नंबर या सर्व गोष्टीचा युपी एटीएस चौकशी करत आहे.

हेही वाचा >> पाकिस्तानी मुस्लिम महिलेचं भारतीय हिंदू तरुणाशी प्रेमप्रकरण! नक्की काय घडलं?

अशी आली भारतात

पाकिस्तानातून भारतात येण्याकरता ती आधी दुबईला गेली. तिथून ती नेपाळला आली. तिथून तिने भारतात अवैध प्रवेश केला. यामुळे कायदा सुव्यवस्थेतील त्रूटी समोर आल्या आहेत. भारतात अवैध राहिल्याप्रकरणी आणि सीमाला राहण्यास जागा दिल्यामुळे सचिनलाही ४ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. या दोघांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. हे दोघेही आता त्यांच्या कुटुंबासोबत ग्रेटर नोएडा येथे राहतात.

सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्यात कशी झाली ओळख?

सीमा हैदर मुळची पाकिस्तानची असून तिला चार मुलं आहेत. तर सचिन मीना हा ग्रेटर नोएडा येथे राहणारा आहे. जागरण या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांची भेट २०१९ मध्ये म्हणजेच कोरोनाकाळात झाली. दोघांनाही पबजी खेळण्याचं वेड होतं. पबजी खेळता खेळता दोघांमध्ये ओळख वाढली. त्यामुळे ते ऑनलाईन अॅपवर तासन् तास गप्पा मारत राहायचे. चार महिने गप्पा मारून झाल्यावर दोघांनी एकमेकांचा नंबर शेअर केला. त्यानंतर, दोघांमध्ये ऑडिओ आणि व्हिडीओ स्वरुपात गप्पा होऊ लागल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीमा हैदर म्हणते मी गुप्तहेर नाही

सचिन आणि सीमाचं हे प्रेमप्रकरण समोर आल्यानंतर सीमावर गुप्तहेर असल्याचा आरोप करण्यात आला होता. ‘इंडिया टुडे’शी बोलताना पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने ती गुप्तहेर असल्याचे आरोप फेटाळले आहेत. ती म्हणाली, “असं काहीही नाही, अखेर सत्य बाहेर येईल. शिवाय असे असते तर मी माझ्या निरागस मुलांसोबत नाही तर एकटीच भारतात आली असते.” सीमाला तिच्या इंग्रजी बोलण्याबाबत प्रश्न विचारला असता तिने उत्तर दिले, “मी फक्त पाचवीपर्यंत शिकली आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया अॅप्सचा वापर करून कोणीही हे करू शकते. मला इंग्रजीचे काही शब्दही बोलता येत नाहीत आणि मला संगणक कसा चालवायचा हे देखील माहित नाही.”