पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील रहिवासी असणाऱ्या आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी लग्न करण्यासाठी एक पाकिस्तानी तरुणी मंगळवारी भारतात आली. जवेरिया खानुम असं या २१ वर्षीय तरुणीचं नाव आहे. भारत सरकारने तिला ४५ दिवसांचा व्हिसा मंजूर केला आहे. वाघा सीमेवरून तिने भारतात प्रवेश केला. यावेळी तिचा होणारा नवरा समीर खान आणि भावी सासरे अहमद कमाल खान युसुफजाई यांनी ढोल वाजवून तिचे दिमाखात स्वागत केले.

विशेष म्हणजे जवेरिया खानुमला भारत सरकारने दोन वेळा व्हिसा नाकारला आहे. दरम्यान, जगभर पसरलेल्या कोविड संसर्गामुळे तिला भारतात येण्यासाठी तब्बल पाच वर्षे वाट पाहावी लागली. जवेरिया भारतात आल्यानंतर या जोडप्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “मी भारत सरकारचे त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानू इच्छित आहे. हेतू शुद्ध असला की सीमारेषाही निरर्थक ठरते,” असं समीर म्हणाला. समीर आणि जवेरिया पुढील वर्षी जानेवारीमध्ये लग्न करणार आहेत. त्यानंतर जेवेरिया दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज करणार आहे.

भारतात आल्यानंतर जवेरियानेही प्रतिक्रिया दिली. “मला ४५ दिवसांचा व्हिसा मंजूर झाला आहे. भारतात आल्यावर मला खूप आनंद झाला. इथे येताच मला खूप प्रेम मिळत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आमचं लग्न पार पडेल. मला पाच वर्षांनी व्हिसा मिळालाय, यावर माझा विश्वासच बसत नाही,” असं जवेरिया म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जवेरियाबरोबरच्या नात्याबद्दल माहिती देताना समीर म्हणाला, “हे सर्व मे २०१८ मध्ये सुरू झालं. त्यावेळी मी जर्मनीहून घरी परतलो होतो. तिथे मी शिक्षणासाठी गेलो होतो. घरी आल्यानंतर मी माझ्या आईच्या फोनवर जवेरियाचा फोटो पाहिला आणि ती मला आवडत असल्याची इच्छा व्यक्त केली. तसेच मी माझ्या आईला सांगितलं की मला जवेरियाशी लग्न करायचं आहे. त्यानंतर आमच्यातील नात्याला सुरुवात झाली.”