पाकिस्तानच्या निवडणुकीत गडबड झाल्याची माहिती समोर येत आहे. एका वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्याने शनिवारी याची कबुली दिली. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावर निवडणुकीत गडबड केल्याचे आरोप केले आहेत. तसेच निवडणुकीत झालेल्या चुकीच्या कामांची जबाबदारी स्वतःवर घेऊन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रावळपिंडीचे माजी आयुक्त लियाकत अली चट्टा यांची ही भूमिका महत्त्वाची मानली जाते. कारण ८ फेब्रुवारी रोजी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाने निवडणुकीत गडबड-गोंधळ झाल्याचा आरोप केला होता. लोकांनी दिलेला कौल चोरल्याबद्दल त्यांच्या पक्षाने देशभरात आंदोलन सुरू केले आहे.

रावळपिंडी येथे पत्रकारांशी बोलताना लियाकत अली चट्टा म्हणाले की, निवडणुकीत जे उमेदवार पराभूत होत होते, त्यांना आम्ही विजयी केले. मी या सर्व अफरातफरीची जबाबदारी घेतो. मुख्य निवडणूक आयुक्त आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश या सर्व प्रकारात सामील आहेत, अशी माहिती चट्टा यांनी दिल्याचे डॉन वृत्तपत्राने जाहीर केले आहे.

विश्लेषण : पाकिस्तानमधील निवडणूक निकालाचा भारताशी संबंधांवर काय परिणाम?

देशाच्या पाठीत खंजीर खुपसला

लियाकत अली चट्टा पुढे म्हणाले की, देशाच्या पाठीत खंजीर खुपसल्यामुळे मला रात्रीची झोपही येत नाही. मी जे चुकीचे काम केले, त्याची शिक्षा मला मिळाली पाहीजे. तसेच या गुन्ह्यात जे अन्य लोक सहभागी आहेत, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहीजे. तसेच चट्टा पुढे म्हणाले की, माझ्यावर खूप दबाव होता. ज्यामुळे मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर हिंमत करून त्यांनी जनतेसमोर सर्व सत्य सांगण्याचा प्रयत्न केला.

“माझे नोकरशाहीला आवाहन आहे की, या राजकीय नेत्यांसाठी कोणतेही चुकीचे काम करून नका”, असेही आवाहन त्यांनी केले. पाकिस्तानमधील जीओ न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, लियाकत आली चट्टा म्हणाले की, माझ्या चुकीच्या कामांसाठी मला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जावी.

पाकिस्तानात निवडणूक गोंधळ, सत्तास्थापनेचं गणित काय? पंतप्रधान कोण होणार? वाचा…

निवडणूक आयोगाने आरोप फेटाळून लावले

दरम्यान पाकिस्तानच्या मुख्य निवडणूक आयोगाने लियाकत अली चट्टा यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. एका निवेदनाद्वारे म्हटले की, रावळपिंडीचे निवडणूक अधिकारी लियाकत अली चट्टा यांनी निवडणूक आयोग किंवा निवडणूक आयुक्तांवर जे बिनबुडाचे आरोप केले, त्याचा आम्ही विरोध करतो. निवडणुकीचे निकाल बदलले जावेत, यासाठी निवडणूक आयोगाने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.