कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर पार्किंग क्षेत्रात १८ जून रोजी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची हत्या करण्यात आली. खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले आहेत. निज्जरची हत्या भारतानेच केली असल्याचा दावा कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी केल्याने वाद चिघळला आहे. परंतु, भारताने आपली भूमिका स्पष्ट केली असून जगभरातूनही भारतालाच पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, निज्जरच्या हत्येचा कट पाकिस्तानात रचला असल्याचे वृत्त समोर आले आहे. इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

भारत आणि कॅनडामधील संबंध ताणण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) ने दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात हत्या घडवून आणली, असं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. आयएसआयने निज्जरला मारण्यासाठी गुन्हेगारांची नियुक्ती केली असल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे. तसंच, आयएसआय आता निज्जरच्या जागी दुसऱ्या माणसाच्या शोधात आहे. खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांना एकत्र आणण्याच्याही प्रयत्न आयएसआय असल्याचं सांगण्यात येतंय.

हेही वाचा >> पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!

१८ जून रोजी कॅनडामध्ये हरदीपसिंग निज्जर याची हत्या झाली. ही हत्या भारताने घडवून आणल्याचा दावा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भर संसदेत केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॅनडाच्या आरोपावर परराष्ट्रमंत्र्यांनी दिलं चोख प्रत्युत्तर

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, “मागील काही वर्षात कॅनडात अनेक संघटित गुन्हे घडले. फुटीरतावादी शक्तींकडून संघटित गुन्हे आणि हिंसाचार झाला. हे सर्व एकमेकांमध्ये फार मिसळून गेलेलं आहे. त्यामुळेच आम्ही तपशील आणि माहितीवर बोलत आहोत. भारत सरकारने कॅनडाला मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची आणि तेथून बाहेर देशात गुन्हे करणाऱ्या नेत्यांची माहिती दिली आहे. भारताने मोठ्या संख्येने प्रत्यार्पणाची विनंती केली आहे,” असंही जयशंकर यांनी नमूद केलं.