पनामा कागदपत्रांत राजकारणी, उद्योगपती, सराफ, माजी क्रिकेटपटूचा समावेश

पनामा कागदपत्रांमधील भारतीय नावांची दुसरी यादी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने मंगळवारी प्रसिद्ध केली. त्यात लोक सत्ता पक्षाचे दिल्ली अध्यक्ष अनुराग केजरीवाल, क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंपनीचे गौतम व करण थापर, मेहरासन्स ज्वेलर्सचे मालक अश्वनी कुमार मेहरा, माजी क्रिकेटपटू अशोक मल्होत्रा आदी नावांचा समावेश आहे.

मेहरासन्स ज्वेलर्सचे मालक अश्वनी कुमार मेहरा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी १९९९ पासून आतापर्यंत बहामा आणि ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्समध्ये ७ परदेशी कंपन्यांची नोंदणी केली. मेहरा यांच्या पत्नी माला राणी, दीपक आणि नवीन ही मुले, पूजा आणि शालिनी या सुना त्या कंपन्यांचे संचालक होते. दीपक मेहरा यांनी सांगितले की, स्टेनबे इंटरनॅशनल लि. आणि मॅक्सहिल होल्डिंग्ज लि. या दोन कंपन्यांमध्ये ते आणि त्यांचे कुटुंबीय भागधारक होते. पण या कंपन्यांनी अफरातफर केलेली नाही. नियमांनुसार या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आणि त्याची विवरणपत्रे प्राप्तिकर खात्याला सादर केली आहेत.

सतीश गोविंग समतानी, विश्लव बहादूर आणि हरीश मोहनानी हे लखनऊ आणि बंगळुरू येथून तयार कपडय़ांचा व्यवसाय चालवतात. ते २००७ आणि २००८ मध्ये ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्समध्ये स्थापन केलेल्या दोन कंपन्यांचे संचालक होते. या कंपन्या काही वर्षांतच बंद करण्यात आल्या. विश्लव बहादूर यांनी याबाबत सांगितले की, चीन आणि युरोपीय देशांमधील व्यवहारांसाठीच्या पत पत्रांच्या सोयीसाठी या कंपन्या स्थापन केल्या होत्या. पण तो मार्ग सोयीचा ठरत नसल्याने या कंपन्या बंद करण्यात आल्या. त्या चालवताना सर्व नियमांचे पालन केले होते.

पंचकुला येथील गुंतवणूक व्यवस्थापक आणि माहिती-तंत्रज्ञान सल्लागार गौतम सिंगल यांनी जून २००६ मध्ये ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्समध्ये आयमीडिया व्हेंचर्स लि. नावाची कंपनी सुरू केली आणि नोव्हेंबर २००९ मध्ये तिचे नाव बदलून जेफ मॉर्गन कॅपिटल लि. असे केले. या कंपन्या माझ्या वडिलांनी स्थापन केल्या आणि त्यांच्याशी माझा काही संबंध नाही, असे गौतम सिंगल यांनी सांगितले.

प्रभाश सांखला हे मध्यप्रदेशमधील माजी सरकारी अधिकारी आहेत. पनामातील लोटस होरायझन एसए या कंपनीत ते संचालक आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे जावई एक यशस्वी उद्योजक असून त्यांच्या कंपनीत ते मानद संचालक आहेत. त्यांचा कंपनीच्या व्यवहारांशी संबंध नाही.

अनुराग केजरीवाल लोक सत्ता पक्षाचे दिल्ली अध्यक्ष होते. २०१४ लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या एका स्टिंग ऑपरेशननंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. ते ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्समधीस ३ कंपन्यांचे संचालक होते तर त्यांनी पनामामध्ये २ कंपन्या स्थापन केल्या होत्या. मी लोहखनिजाचा व्यापार करतो. त्यासाठी योग्य मार्गाने आम्हाला कमिशन मिळते. माझ्या भागीदारांच्या मदतीने या कंपन्या स्थापन केल्या होत्या. मात्र परदेशी कंपन्यांच्या बाबतीत भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे नियम फारच किचकट असल्याचे आणि परदेशांत कंपन्या स्थापणे मला गोत्यात आणणारे असल्याचे लक्षात आल्याने त्या कंपन्या २०१० मध्ये बंद केल्या, असे अनुराग केजरीवाल यांनी सांगितले.

विनोद रामचंद्र जाधव पुण्यातील सावा हेल्दकेअरचे अध्यक्ष आहेत. त्यांची कंपनी अहमदनगर आणि बंगळुरू येथे आरोग्यविषयक उत्पादनांची निर्मिती करते. ते ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्समध्ये २०१० ते २०१५ या काळात स्थापन केलेल्या अनेक कंपन्यांचे संचालक आहेत. त्यातील किमान दोन कंपन्या बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. माझ्या सर्व कंपन्यांची, पदांची आणि मिळकतीची माहिती मी दरवर्षी प्राप्तिकर विभाग, भारतीय रिझव्‍‌र्ह बँक आणि अन्य संस्थांना देत आहे. त्यामुळे गतवर्षी आलेल्या परदेशी मालमत्ता जाहीर करून सवलती मिळवण्याच्या योजनेअंतर्गत माहिती उघड करण्याची मला गरज वाटली नाही. माझे सर्व व्यवहार पारदर्शी आहेत, असे जाधव यांनी सांगितले.

क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंपनीचे गौतम व करण थापर यांनीही पनामामध्ये चार्लवुड फाऊंडेशन आणि निकॉम इंटरनॅशनल फाऊंडेशन या कंपन्या स्थापन केल्या. गौतम थापर यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार चार्लवुड फाऊंडेशन या कंपनीशी त्यांचा काही संबंध नसून त्यांची पत्नी स्टेफनी या त्या कंपनीच्या लाभार्थी आहेत. त्या जर्मन नागरिक असून सध्या ब्रिटनमध्ये राहतात. करण थापर यांच्या कंपनीने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने पाठवलेल्या ई-मेलना उत्तर देण्याचे मान्य केले मात्र उत्तर पाठवले नाही.

माजी क्रिकेटपटू अशोक मल्होत्रा कोलकातामध्ये क्रिकेट अकादमी चालवतात. ते ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्समधील २००८ साली स्थापन झालेल्या इ अँड पी ऑनलुकर्स लि. या कंपनीचे भागधारक आणि संचालक होते. ब्रिटिश नागरिक संदीप रस्तोगी कंपनीचे पहिले संचालक होते. रस्तोगी यांनी त्यांचे शेअर्स मल्होत्रा यांच्या नावावर केले आणि २००९ साली मल्होत्रा कंपनीचे संचालक झाले. पण मल्होत्रा यांनी शेअर त्यांच्या नावावर झाल्याबद्दल आठवत नसल्याचे सांगितले.

राजीव दहुजा आणि कपिल सैन गोएल चंदिगडमध्ये बर्कले ऑटोमोबाइल्स ही ह्य़ुंदाई व टाटा मोटर्स कंपन्यांची डिलरशिप चालवतात. ते ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्समधील बिल्स इंटरनॅशनल कॉर्पोरेशनचे संचालक होते. दहुजा आणि गोएल यांनी सांगितले की त्यांनी कंपनी स्थापन केली, मात्र तिच्या माध्यमातून कोणतेही व्यवहार केले नाहीत. विवेक जैन हा पदवीधर मध्यप्रदेशमध्ये शेतीमालाचे दुकान चालवतो. तो ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स आणि हाँगकाँग येथील सॅक्विनम ग्लोबल एसए आणि रॅडिएंट वर्ल्ड होल्डिंग्ज या कंपन्यांचा संचालक व भागधारक आहे. जैन यांनी सांगितले की, त्यांना अशा कंपन्या त्यांच्या नावावर अस्तित्वात असल्याची माहिती नाही.