नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा घेण्याच्या मागणीसाठी सोमवारी काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला. गोंधळातच लोकसभेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व राज्यसभेत सभागृहनेता जे. पी. नड्डा यांनी या मुद्द्यावर सविस्तर चर्चेस सरकार तयार असल्याचे सांगितले. पुढील आठवड्यामध्ये या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’वर किमान दोन दिवस चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने सर्वपक्षीय बैठकीमध्ये केली होती. यासंदर्भात दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये चर्चेचा कालावधी निश्चित केला जाणार असला तरी, चर्चेसाठी १६ तास राखीव ठेवण्याची केंद्र सरकारची तयारी असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून परदेश दौऱ्यावर असल्यामुळे पुढील आठवड्यात चर्चेचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजते. चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह व केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर या तिघांनीही सभागृहात हजर राहिले पाहिजे व चर्चेला स्वत: मोदींनी उत्तर द्यावे, अशी काँग्रेसची मागणी आहे.

दरम्यान, सोमवारी पहिल्या दिवशी लोकसभेत कामकाज सुरू होताच, काँग्रेससह ‘इंडिया’च्या सदस्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चेची मागणी करत लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या समोरील जागेत जात घोषणाबाजी सुरू केली. बिर्लांनी स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर ‘सभागृहात बोलू दिले जात नाही,’ असा आरोप करत विरोधकांनी गोंधळ घातला. लोकसभेत विरोधी पक्षनेत्याला बोलू न देण्याची नवी प्रथा सुरू झाली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनीही संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना केला.

संसदीय कामकाजमंत्री रिजिजू व सिंह यांनी सरकार चर्चेला तयार असून विरोधकच चर्चेपासून पळून जात असल्याचा आरोप केला. लोकसभेत पीठासीन अधिकारी जगदम्बिका पाल यांनी राहुल गांधी यांच्यावर ताशेरे ओढले. चर्चेच्या वेळी स्वत: राहुल गांधीच सभागृहात उपस्थित राहात नाहीत, अशी शेरेबाजी केली. या गदारोळात लोकसभा ४ वाजेपर्यंत तीन वेळा तहकूब झाली. दुपारी दोननंतर सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेसने बिहारमधील मतदार फेरआढावा मोहिमेवर चर्चेची मागणी केली. या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला.

राज्यसभेतही प्रामुख्याने काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले होते. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे व इतर सदस्यांनी नियम २६७ अंतर्गत ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चेची मागणी केली. खरगेंची ही नोटीस स्वीकारल्याचे सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहात सांगितले. या नोटिशीच्या निमित्ताने सभागृहात खरगेंनी, पहलगाममधील हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ आदी मुद्द्यावर केंद्र सरकारला धारेवर धरले. खरगेंच्या आरोपांवर तीव्र आक्षेप घेत, नड्डा यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्याचा दावा केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संसदेचे पावसाळी अधिवेशन विजयोत्सवाचे आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानविरोधात आपल्या लष्कराला १०० टक्के लक्ष्य साध्य करण्यात यश आले. देशी बनावटीच्या संरक्षण उत्पादनांच्या साह्याने भारताने लष्करी सामर्थ्य निर्माण केले आहे. भारताच्या नव्या लष्करी ताकदीमुळे जग प्रभावित झाल्याचे पाहायला मिळाले. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान