Parliament Monsoon Session 2025 : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची घटना आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलाने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात संसदेत चर्चा सुरू आहे. ऑपरेशन सिंदूरसंदर्भात चर्चा पार पडत असताना सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरवरून आणि भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवरून अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यावर आज (२९ जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं. तसेच ऑपरेशन सिंदूरबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर माहिती संसदेत दिली.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानकडून देण्यात आलेल्या अणुबॉम्बच्या धमक्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलं. तसेच ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताला कोणत्या देशांनी पाठिंबा दिला होता याची देखील माहिती मोदींनी सांगितली. देशातील विरांच्या पराक्रमाला जगाचा पाठिंबा मिळाला, पण काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नसल्याचं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“विरोधकांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावरही बरीच टीका केली. तसेच ऑपरेशन सिंदूर संदर्भात जगातील देशांनी दिलेल्या पाठिंब्याबाबतही बरीच चर्चा झाली. मात्र, आज मी स्पष्ट करू इच्छितो की जगातील कोणत्याही देशाने भारताला आपल्या सुरक्षेसाठी कारवाई करताना कोणीही रोखलं नाही. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान संयुक्त राष्ट्र, १९३ देशांपैकी फक्त पाकिस्तानच्या बाजूने तीनच देश बोलत होते. फ्रान्स, ग्रीस, जर्मनी आणि कोणत्याही देशाचं नाव घ्या. संपूर्ण जगाने भारताला समर्थन दिलं. संपूर्ण जगभरातील देशांचा भारताला पाठिंबा मिळाला. पण दे दुर्दैव आहे की देशाच्या जवानांच्या शौर्याला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

“‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात भारताची बाजू मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. तसेच ज्यांना भारताची बाजू दिसत नाही, त्यांना आरसा दाखवण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. हा विजयोत्सव भारतीय सैन्याचा शौर्याचा आहे. दहशतवाद्यांना मातीत गाडलं त्याचा हा विजयोत्सव आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या. तसेच भारतात दंगली घडवण्याचा कट होता. मात्र, देशाने हा प्रयत्न हाणून पाडला. मी तेव्हाच सांगितलं होतं की दहशतवाद्यांना आम्ही मातीत मिळवल्याशिवाय राहणार नाही. हे देखील सांगितलं होतं की दहशतवाद्यांच्या आकांना देखील सजा मिळेल. एवढंच नाही तर कल्पनेच्याही पलिकडे सजा मिळेल असंही सांगितलं होतं”, असं मोदींनी म्हटलं.

“ऑपरेशन सिंदूर राबवून २२ मिनिटांत २२ एप्रिलचा बदला घेतला”

“आम्हाला गर्व आहे की दहशतवाद्यांना आम्ही शिक्षा दिली. ती शिक्षा अशी होती की दहशतवाद्यांच्या म्होरक्यांची झोप उडाली आहे. पहलगाम हल्ला झाल्यानंतरच पाकिस्तानला समजलं होतं भारत काहीतरी मोठं पाऊल उचलणार आहे. ६ मे च्या रात्री आम्ही २२ मिनिटांत २२ एप्रिलचा बदला आपल्या सैन्य दलांनी घेतला. पहिल्यांदा असं घडलं की पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यातले दहशतवादी तळ आपण उद्ध्वस्त केले. बहावलपूर, मुरिके हेदेखील आपण जमीनदोस्त केलं. पाकिस्तानच्या अणुशक्तीच्या धमकीला आपण खोटं ठरवून दाखवलं. न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग नाही चालणार आणि त्यापुढे भारत झुकणार नाही हे देखील आम्ही दाखवून दिली. भारताने आपली तांत्रिक ताकद दाखवून दिले. पाकिस्तानच्या छातीवर आपण अचूक प्रहार केले. पाकिस्तानचे हवाई तळ आपण उद्ध्वस्त केले. टेक्नॉलॉजीशी आधारे युद्ध करण्याचे हे दिवस आहेत. ऑपरेशन सिंदूरला यातही यश मिळालं आहे. मागच्या दहा वर्षांत आपण जी तयारी केली आहे ती केली नसती तर आपला टिकाव लागणं कठीण होतं”, असंही मोदी यांनी म्हटलं आहे.