नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि काँग्रेस यांच्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभापासून सुरू झालेला वाद संसदेच्या दोन्ही सभागृहांत आणि संसदेबाहेरही अद्याप सुरूच असून शुक्रवारी त्याची तीव्रता आणखी वाढली. काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींचा केलेला आक्षेपार्ह उल्लेख, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि सोनिया गांधी यांच्यात झालेली चकमक, अग्निवीर योजना, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतवाढीसह अन्य मुद्दय़ांवर चर्चेची विरोधकांची मागणी आणि सत्ताधाऱ्यांचा त्याला असलेला विरोध यावरून झालेल्या गोंधळात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले.

अधीर रंजन चौधरी यांच्या ‘राष्ट्रपत्नी’ या वक्तव्यावरून लोकसभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनिया गांधींशी अपमानास्पदरीत्या वाद घालण्याचा प्रयत्न केल्याने काँग्रेसने शुक्रवारी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. इराणी यांनी सोनिया गांधी यांच्याशी केलेल्या वर्तनाबद्दल सरकारने माफी मागावी, अशी मागणी करत काँग्रेस खासदारांनी संसद संकुलातील गांधी पुतळय़ासमोर निदर्शने केली. लोकसभेतही काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केला आणि इराणी यांनी सोनियांचा अपमान केल्याचा आरोप केला. काँग्रेसने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडेही याबाबत तक्रार केली आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेतही हा मुद्दा मांडला.

अधिवेशनादरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विरोधी पक्षांच्या सरकारविरोधी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नवव्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच ते काही मिनिटांत स्थगित करावे लागले. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या खासदारांनी महागाई, जीएसटी आणि अग्निपथ योजनेवर चर्चेची मागणी करीत गोंधळ घातल्यानंतर सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले.

दरम्यान, निर्मला सीतारामन आणि पीयूष गोयल यांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल गुरुवारी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य कामकाजातून वगळण्याची मागणी काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकया नायडू यांच्याकडे पत्राद्वारे केली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबतच्या काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्या ‘राष्ट्रपत्नी’ या टिप्पणीवरून शुक्रवारी सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्ये पुन्हा खडाजंगी झाल्याने लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. सभागृहाचे कामकाज प्रथम दुपारी १२ पर्यंत तहकूब करण्यात आले. १२ वाजता कामकाज सुरू होताच पुन्हा विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात शाब्दिक चकमकी झडल्या. काँग्रेसचे खासदार सरकारविरोधी घोषणा देत अध्यक्षांपुढील मोकळय़ा जागेत धावल्यानंतर काही केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या खासदारांनीही ‘राष्ट्रपत्नी’ उल्लेखाप्रकरणी सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी करीत गोंधळ घातला. 

चौधरी यांच्या वक्तव्यावरून गुरुवारी मोठा वाद उद्भवला होता. सत्ताधारी खासदारांनी काँग्रेसवर हल्ला चढवला होता. चौधरी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचा जाणूनबुजून अपमान केल्याचा आरोप करीत भाजपच्या सदस्यांनी सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. राष्ट्रपतींचा अवमान करण्याचा हेतू नव्हता तर माझ्याकडून तो शब्द चुकून उच्चारला गेल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही गोंधळ सुरूच राहिल्याने अध्यक्षांनी कामकाज सोमवापर्यंत स्थगित केले.

विविध मुद्दय़ांवर विरोधी सदस्यांनी गोंधळ घातल्याने शुक्रवारी राज्यसभेचे कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहात सलग दुसऱ्या आठवडय़ात कोणतेही महत्त्वाचे कामकाज होऊ शकले नाही. कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी आतापर्यंत २३ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. सकाळी कामकाज तहकूब केल्यानंतर दुपारी १२ वाजता सभागृह सुरू होताच काँग्रेसच्या सदस्यांनी मोकळय़ा जागेत धाव घेतली आणि सरकारविरोधात तुंबळ घोषणाबाजी केली.

विरोधकांनी गुजरातमध्ये विषारी दारूबळींचा विषय उपस्थित केला. तसेच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा कथित अपमान केल्याचा आरोप करीत त्यांच्या बडतर्फीची मागणी केली. काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह उल्लेखावरून सत्ताधारी सदस्यही आक्रमक झाले. त्यामुळे सभापतींनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

.. आणि बाहेरही

* लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे ‘राष्ट्रपत्नी’ या उल्लेखाबद्दल माफी मागितल्यानंतरही राजकीय वादळ तीव्र. 

* स्मृती इराणी यांच्यासह भाजपच्या खासदारांनी सोनिया गांधींशी कथित गैरवर्तन करून त्यांना आव्हान दिल्याबद्दल संसदेत आणि संसदेबाहेरही काँग्रेसची निदर्शने.

* स्मृती इराणींना बडतर्फ करण्याची काँग्रेसची मागणी, तर अधीर रंजन चौधरी यांच्या ‘राष्ट्रपत्नी’ उल्लेखप्रकरणी सोनिया गांधींनी माफी मागण्याची भाजपची मागणी.

* काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांची परस्परांविरोधात उत्तर प्रदेश, इशान्येसह देशाच्या अनेक भागांत आंदोलने.

सुविधा मागे घेतल्याचा निलंबित खासदारांचा आरोप

नवी दिल्ली : निलंबित विरोधी खासदार संसद आवारात आंदोलन करीत आहेत. त्यांना सरकारतर्फे सुविधा पुरविण्यात येत होत्या. परंतु त्यापैकी काही सुविधा सरकारने काढून घेतल्याचा आरोप विरोधी पक्षांनी शुक्रवारी केला. निलंबित खासदारांनी बुधवारी ५० तास धरणे धरले होते. त्यांना संसद सचिवालयाच्या वतीने दोन रुग्णवाहिका, डॉक्टर, दोन वाहन चालक, देखभालीसाठी कर्मचारी यांची व्यवस्था आंदोलनस्थळी करण्यात आली होती.

काँग्रेसचे अधीर रंजन यांचा राष्ट्रपतींकडे माफीनामा

नवी दिल्ली : काँग्रेसचे लोकसभेतील खासदार अधीर रंजन चौधरी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची लेखी माफी मागितली. चौधरी यांनी एका वृत्त माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा केला होता. त्यावरून संसदेत गदारोळ झाला होता. ‘‘आपल्या पदाचा उल्लेख करण्यासाठी मी भूलचुकीने चुकीचा शब्द वापरला. त्याबद्दल मी माफी मागतो आणि माझा माफीनामा आपण स्वीकारावा, अशी विनंती करतो,’’ असे चौधरी यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या माफीपत्रात नमूद केले आहे.