Mallikarjun Kharge On Parliament Uproar : दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत एक विधान केले होते. शाह याच्या या विधानानंतर देशभरात विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आज संसदेच्या मकर द्वारावर याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे खासदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यातच या दरम्यान दोन्हीकडील खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली. यानंतर राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी राज्यसभा सभापतींना पत्र लिहित, “भाजपा खासदारांनी धक्काबुक्की केल्याने गुडघ्याला दुखापत झाली”, असे म्हटले आहे. सध्या सर्वत्र खरगे यांचे हे पत्र व्हायरल होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही यावेळी खरगे यांनी केली आहे.

यावेळी खरगे यांनी म्हटले की, “हा हल्ला त्यांच्यावरील वैयक्तीक हल्ला नसून, राज्यसभेचा विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षावरील हल्ला आहे.”

खरगेंच्या पत्रात काय आहे?

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधीपक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी राज्यसभेच्या सभापतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, “माननीय सभापती, आज सकाळी इंडिया आघाडीच्या खासदारांनी प्रेरणा स्थळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मकरद्वारपर्यंत पदयात्रा काढली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी १७ डिसेंबर २०१४ रोजी राज्यसभेत केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. जेव्हा मी इंडिया आघाडीच्या खासदारांसह मकर द्वारला पोहोचलो तेव्हा भाजपच्या खासदारांनी मला धक्काबुक्की केली. त्यानंतर माझा तोल गेला आणि मला मकरद्वारसमोर जमिनीवर बसावे लागले. यामुळे माझ्या आधीच शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्याला दुखापत झाली. मी तुम्हाला विनंती करतो की, या घटनेच्या चौकशीचे आदेश द्यावेत, हा केवळ माझ्यावरच नव्हे, तर राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्षांवर झालेला हल्ला आहे.”

हे ही वाचा : “राहुल गांधींमुळे मला दुखापत”, जखमी भाजपा खासदाराचा दावा; संसद परिसरात सत्ताधारी-विरोधकांमध्ये धक्काबुक्की

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा खासदाराचे राहुल गांधींवर धक्काबुक्कीचे आरोप

दरम्यान भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनीही लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. “राहुल गांधींनी एका खासदाराला ढकल्यामुळे तो खासदार माझ्या अंगावर पडला आणि मी जखमी झालो”, असे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनी केले आहेत. दरम्यान राहुल गांधी यांनी सारंगी यांचे आरोप फेटाळले आहेत.