Parliament Security Breach Update : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्वाचे विधेयक मंजूर करण्यात आले आहेत. तसेच देशातील विविध विषयांवर देखील संसदेत चर्चा पार पडली. केंद्र सरकारने काही विधेयक मंजूर केल्यामुळे त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. मात्र, असं असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. संसदेच्या सुरक्षेचं उल्लंघन करत एका व्यक्तीने संसदेच्या भिंतीवरून उडी मारल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान घडली आहे.

संसदेच्या सुरक्षेचं उल्लंघन करत आज सकाळी एका व्यक्तीने संसदेच्या भिंतीवरून उडी मारत आत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार संसद सुरक्षा रक्षकांच्या तात्काळ लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र, पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, सदर व्यक्ती संसद भवनात कसा घुसला? याचा तपास करण्यात येत आहे. माहितीनुसार, आरोपी संसद भवन संकुलाजवळील एका झाडावर चढला आणि तो संसद भवनाच्या भिंतीवर पोहोचला. त्यानंतर त्याने संसदेच्या आवारात उडी मारली. पण ही गोष्ट तेथील सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच त्याची आता चौकशी करण्यात येत आहे.

एका वर्षापूर्वीही संसदेच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्या होत्या

एका वर्षापूर्वी १६ ऑगस्ट २०२४ रोजी लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन अज्ञात इसमांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या घेतल्या होत्या. खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत दोन व्यक्ती लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते. यावेळी त्यांच्या हातात दोन कॅन होते, ज्यातून पिवळा धूर निघत होता. खासदारांनीच या दोघांना पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण हा धूर जर विषारी असता तर मोठा अनर्थ घडला असता. तसेच संसदेची नवी इमारत सुरक्षेच्यादृष्टीने इतकी कमकुवत कशी? असा प्रश्न तेव्हा विरोधी खासदारांनी उपस्थित केला होता. तेव्हा दोन लोकांनी लोकसभा सभागृहात उडी मारल्याने गोंधळ उडाला होता. त्यानंतर त्यातील आरोपींना अटक करत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं होतं.