काही तासांनंतर वाहिनी पूर्ववत
नवी दिल्ली : ‘यूटय़ुब’वरील ‘संसद टीव्ही’चे खाते मंगळवारी हॅक करण्यात आल़े त्यानंतर ‘सामूहिक मार्गदर्शक तत्त्वां’चे उल्लंघन झाल्याबद्दल हे खाते काही तासांसाठी बंद करण्यात आले. संध्याकाळपर्यंत हे खाते पूर्ववत झाले. मध्यरात्री एकच्या सुमारास हॅकर्सनी हल्ला केल्याचा दावा ‘संसद टीव्ही’च्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला.
‘संसद टीव्ही’वर लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाते. तसेच, अन्य कार्यक्रमही नियमितपणे दाखवले जातात. विविध वृत्तवाहिन्यांच्या ‘यूटय़ुब’ खात्याप्रमाणे ‘संसद टीव्ही’चेही ‘यूटय़ुब’ खाते आहे. या वाहिनीच्या ‘यूटय़ुब’मध्ये हॅकर्सनी फेरफार करून ‘संसद टीव्ही’चे नाव ‘इथेरियम’ केले होते. ‘इथेरियम’ हे लोकप्रिय कुटचलन आहे. ‘संसद टीव्ही’चे खाते हॅक झाल्यामुळे या वाहिनीचे ‘यू टय़ुब’वरील प्रक्षेपण पूर्णपणे बंद झाले होते.
खाते हॅक झाल्याचे लक्षात येताच ‘संसद टीव्ही’च्या समाजमाध्यम चमूतील तंत्रज्ञांनी तातडीने कार्यवाही करत हे खाते पूर्ववत केल्याने मंगळवारी पहाटे पावणेचार वाजता ‘यू टय़ुब’वर ही वाहिनी उपलब्ध झाल्याचा दावा प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आला. मात्र, ही वाहिनी ‘यू टय़ुब’वर मंगळवारी संध्याकाळी पूर्ववत झाली. मार्च २०२१ मध्ये ‘लोकसभा टीव्ही’ आणि ‘राज्यसभा टीव्ही’ या दोन सरकारी दूरचित्रवाणी वाहिन्यांचे विलीनीकरण करण्यात आले व ‘संसद टीव्ही’ ही नवी दूरचित्रवाणी वाहिनी सुरू करण्यात आली.
झाले काय? भारतातील सायबर सुरक्षा घटनांची दखल घेऊन प्रतिसाद देणाऱ्या ‘इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ (सर्ट-इन) या मध्यवर्ती संस्थेने हॅकिंगसंदर्भात ‘संसद टीव्ही’ला सतर्क केले. ‘यूटय़ुब’नेही सुरक्षा धोक्यांचे निराकरण केले. मंगळवारी दुपापर्यंत वाहिनीच्या ‘यूटय़ुब’वर ‘४०४’ क्रमांकाच्या त्रुटीचा संदेश दिसत होता. ‘संसद टीव्ही’च्या खात्याने सामूहिक मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याचे कारण देत हे खाते बंद करण्यात आले. या संदर्भात ‘यूटय़ुब’ची मूळ कंपनी ‘गुगल’ने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. स्पॅम आणि फसवी माहिती, संवेदनशील मजकूर, लहान मुलांच्या सुरक्षेला धोका, तोतयागिरी, नग्नता आणि लैंगिक मजकूर, आत्महत्येला प्रवृत्त करणारी माहिती, असभ्य भाषा आदी बाबींमुळे ‘यूटय़ुब’कडून खाते बंद करण्याची कारवाई केली जाते.