काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्यासह आज चार खासदार राज्यसभेतून निवृत्त झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सभागृहातील सदस्यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. वेगवेगळ्या घटनांचं स्मरण करतानाच त्यांच्याशी असलेल्या व्यक्तिगत मैत्रीच्या आठवणीही यावेळी सदस्यांनी सभागृहात सांगितल्या. शरद पवार यांनीही आझादाविषयीचा एक किस्सा सभागृहात सांगितलं. आझाद यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यामध्ये कसे अपयशी झालो याची आठवण शरद पवारांनी निरोप देताना सांगितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर शरद पवार यांनी गुलाम नबी आझाद यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर त्यांच्या कार्याचाही आढावा घेतला. गुलाम नबी आझाद यांना निवडणुकीत पाडण्यासाठी कसा प्रयत्न केला होता, याचा किस्सा शरद पवारांनी सांगितला. ते म्हणाले, “१९८२ च्या निवडणुकीची ही गोष्ट आहे. गुलाम नबी आझाद हे जम्मू-काश्मीरमधून येतात, पण ८२ मध्ये ते महाराष्ट्रातील वाशिमसारख्या मागास भागातून निवडणुकीत उभे राहिले होते. वाशिमसारख्या मागास भागातून निवडणूक लढवण्याची त्याकाळात कोणीच हिंमत करत नसायचे. पण आझाद यांनी ही हिंमत दाखवली आणि त्यांनी निवडणूक लढली. त्यावेळी मी विरोधी पक्षात होतो. आम्ही ठरवलं, आझाद यांना निवडून येऊ द्यायचं नाही. त्यांना पाडायचं. आम्ही खूप प्रयत्न केले. आझाद यांच्या विरोधात प्रचाराचं रान उठवलं. पण तरीही आझाद निवडून आले. त्यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर त्यांचं आणि वाशिमकरांचं अतूट नातं निर्माण झालं,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

आणखी वाचा- मी निरोप देणार नाही, परत येईपर्यंत तुमची वाट बघेन – संजय राऊत

“गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभा, लोकसभेमध्येही खासदार म्हणून काम पाहिलं. त्यांनी मंत्री म्हणून अनेक खात्याचा कारभार पाहिला. जवळजवळ सर्व समित्यांवर काम करणारा एकमेव नेता म्हणूनही आझाद यांच्याकडं पाहिले जातं. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. संसदीय आणि राजकीय अनुभव असलेले आझाद हे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी देशाच्या हिताला नेहमीच महत्त्व दिलं. देशासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. आज काश्मीरमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे. अशा वातावरणात आझाद यांची गरज असताना ते राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यांची आजही गरज आहे. त्यांची जागा घेणं कठीण आहे. उद्या काश्मीरमध्ये निवडणुका झाल्यास ते परत संसदेत येतील, अशी आशा आहे, असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parliament updates farewell to ghulam nabi azad sharad pawar praises ghulam nabi azad bmh
First published on: 09-02-2021 at 12:34 IST